अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींची माहिती अपूर्ण असल्याच्या मुद्यावर तीव्र संताप व्यक्त करीत राज्याच्या रोहयो खात्याच्या प्रधान सचिवांनी जिल्ह्यातील संबंधित अधिकार्यांची मंगळवारी चांगलीच कानउघाडणी केली.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यातील सिंचन विहिरींच्या कामांसंदर्भात राज्य शासनाच्या रोहयो खात्याचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांनी मंगळवार, १६ सप्टेंबर रोजी नागपूर येथे संबंधित अधिकार्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला राज्यातील विविध जिल्ह्यांचे उपजिल्हाधिकारी (रोहयो) आणि जिल्हा परिषद लघू सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंते उपस्थित होते. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातून उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रमोदसिंह दुबे आणि जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे उपअभियंता जोशी हेदेखील उपस्थित होते. सिंचन विहिरी कामांच्या जिल्हानिहाय आढाव्यात अकोला जिल्ह्यातील सिंचन विहिरींच्या कामांची अ पूर्ण माहिती असल्याच्या मुद्यावर प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांनी चांगलाच संताप व्यक्त करीत, परिपूर्ण माहिती सादर करण्यात आली नसल्याने, उपजिल्हाधिकारी (रोहयो), लघुसिंचन विभागाचे उपअभियंता यांची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच जिल्ह्यातील सिंचन विहिरींच्या कामांची परिपूर्ण माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देशही प्रधान सचिवांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.शनिवारी बोलावली बैठक!जिल्ह्यातील सिंचन विहिरींच्या कामांची परिपूर्ण माहिती घेण्यासाठी शनिवार, २0 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी संबंधित यंत्रणांच्या अधिकार्यांची बैठक बोलावली आहे.