मलकापूर (बुलडाणा) : गेल्या २ वर्षापासून प्रलंबित पडलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाकरिता प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणारा मोबदला अखेर वाढीव दराने सुमारे १९ कोटी रुपयांचा निधी भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. त्यामुळे लवकरच प्रकल्पग्रस्तांना या निधीचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ.दिनेशचंद्र वानखेडे तथा राष्ट्रीय महामार्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष सुभाषराव पाटील यांनी दिली, आहे.नागपूर ते मुंबई महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाचे काम नागपूर ते अमरावती व धुळे ते मुंबईपर्यंत पूर्णत्वात गेलेले आहे. मात्र अमरावती ते जळगाव खान्देशपर्यंत काही तांत्रिक बाबी तथा नजरचुकीने झालेल्या सर्वेक्षणामुळे व वाढीव मोबदला देण्याच्या कारणास्तव महामार्गाच्या कामाचे भिजत घोंगडे पडले होते. याबाबत राष्ट्रीय महामार्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष सुभाषराव पाटील व त्यांच्या सहकार्यांनी शेतकर्यांना वाढीव दराने मोबदला मिळावा ही मागणी लावून धरली होती. ५ दिवसांपूर्वी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आदेशान्वये सदर प्रकल्पांना देण्यात येणारी १९ कोटी रुपये मोबदल्याची रक्कम भूसंपादन अधिकारी महामार्ग तथा उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. सदर रककम मलकापूर व नांदुरा शहर सोडून मलकापूर तालुक्यातील रणथम, विवरा, दसरखेड, तालसवाडा, तांदुळवाडी, लहे खु., धरणगाव, बहापुरा, वाघुळ तर नांदुरा तालुक्यातील नांदुरा बु., सांगवा, अंभोडा, नायगाव, कोलासर, धानोरा विटाळी, गोंधनखेड, वडी, खुदानपूर, वडनेर-१, वडनेर -२, रसुलपूर या गावातील महामार्गावर असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकरी, उद्योजक, व्यावसायिक, लघुउद्योजक, हॉटेल मालक, ढाबे यांचा समावेश आहे. महामार्गावरील प्रकल्पग्रस्तांकरिता देण्यात येणारा वाढीव मोबदल्याची रक्कम १९ कोटी रुपये जमा झाली असून ती रक्कम येत्या १५ ते २0 दिवसांमध्ये प्रशासकीय प्रक्रीया पूर्ण करुन ती रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याचे मलकापूर येथील भूसंपादन अधिकारी महामार्ग तथा उपविभागीय अधिकारी डॉ.दिनेशचंद्र वानखेडे यांनी सांगीतले.
महामार्ग प्रकल्पग्रस्तांसाठी १९ कोटीचा निधी प्राप्त
By admin | Updated: October 23, 2014 00:06 IST