अकोला: दुष्काळी परिस्थितीत लोकांना वेठीस धरू नका, टंचाईग्रस्त गावांमध्ये शेतीसाठी दिवसा किमान सात तास अखंड वीज पुरवठा करण्याचे निर्देश महसूल तथा मदत व पुनर्वसनमंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी येथे दिले. अकोल्यातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कमिटी हॉलमध्ये आयोजित अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीबाबत लोकप्रतिनिधी व अधिकार्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, महापौर उज्ज्वला देशमुख, अकोल्याचे जिल्हाधिकारी अरुण शिंदे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे, वाशिमचे जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ. हरीश पिंपळे, आ. प्रकाश भारसाकळे, आ.बळीराम सिरस्कार, आ.राजेंद्र पाटणी, आ.लखन मलिक उपस्थित होते. अकोला व वाशिम या दोन्ही जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा महसूल मंत्र्यांनी यावेळी घेतला. पाणीटंचाईच्या परिस्थितीचीही त्यांनी माहिती घेतली. टंचाईच्या परिस्थितीत लोकांना वेठीस धरू नका, असे सांगत टंचाईग्रस्त गावातील कृषी पंपांची वीज जोडणी तोडू नका, दिवसा शेतीसाठी किमान सात तास अखंड वीज पुरवठा करण्याचे निर्देश खडसे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांना दिले. राज्यात १९ हजार गावांमध्ये टंचाई परिस्थिती असून, त्यामध्ये मराठवाड्यातील ८ गावांसह विदर्भातील अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्ह्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. या पृष्ठभूमीवर टंचाईग्रस्त गावांमध्ये शेतकर्यांना दिलासा मिळाला पाहिजे, तसेच पिण्याचे पाणी, मजुरांना काम व जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्याचे सरकारचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले. अकोला व वाशिम दोन्ही जिल्ह्यांची खरीप पिकांची पैसेवारी ५0 पैशांच्या आत असून, टंचाई परिस्थितीत इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्यासाठी वैरण विकास कार्यक्रमांतर्गत चारा निर्मिती करण्याचे निर्देश खडसे यांनी यावेळी दिले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गावाशेजारीच मजुरांना काम मिळाले पाहिजे, पाणीटंचाईचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक ती कारवाई तातडीने करण्याचे निर्देशही खडसे यांनी यावेळी दिले. पाणीटंचाई निवारणासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या आढावा बैठकीला अकोला व वाशिम या दोन्ही जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.
शेतीसाठी दिवसा सात तास अखंड वीज पुरवठा करा!
By admin | Updated: November 24, 2014 00:00 IST