शहरात उघड्यावर वास्तव्य करणाऱ्या बेघर व्यक्तींसाठी महानगरपालिकेद्वारे निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. या निवारा केंद्राला बच्चू कडू यांनी भेट देऊन निवारा केंद्रातील नागरिकांच्या सोयी-सुविधा व समस्या जाणून घेतल्या. या वेळी कडू यांनी प्रशासनास निर्देश दिले की, शहरात विविध ठिकाणी भिक्षा मागून जगणाऱ्या व बेघर व्यक्तींना निवारा उपलब्ध करून द्यावा. तसेच त्यांना निर्वाह भत्ता लागू करावा. केंद्रातील व्यक्तींना त्यांच्या शारीरिक क्षमता व कौशल्यानुसार रोजगार उपलब्ध करून द्यावा. केंद्रातील व्यक्तींना वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या करून औषधोपचार व मूलभूत गरजा पूर्ण करण्याकरिता प्रशासनाने आवश्यक ती मदत पुरविण्याचे निर्देश त्यांनी या वेळी दिले.
आशाकिरण महिला विकास संस्थेद्वारे निवारा केंद्रातील व्यक्तींकरिता केलेल्या कामाचे कौतुक केले. सोबतच निवारा केंद्रातील व्यक्तींकरिता सहली, मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम, सण-उत्सव व प्रमुख व्यक्तींचे वाढदिवस येथे साजरा करण्याचेही आवाहन कडू यांनी केले. केंद्रातील व्यक्तींनी भिक्षा न मागता आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण उपस्थित होते.