अकोला : महापालिकेच्या रखडलेल्या प्रस्तावांमुळे शहराचा विकास ठप्प पडून आहे. प्रशासन व पदाधिकार्यांच्या समन्वयाअभावी ही स्थिती कायम आहे. असे रखडलेले प्रस्ताव निकाली काढण्यासाठी नगर विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पुढाकार घेतला असून, यासंदर्भात ३ जानेवारी रोजी मनपा अधिकार्यांची मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या भूमिकेकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.महापालिकेसह राज्य व केंद्रात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आहे. जिल्ह्यात सुद्धा भाजपचे राजकीय वर्चस्व आहे. अशास्थितीत मागील सात वर्षांपासून शहराच्या ठप्प पडलेल्या विकासाची गाडी रुळावर येईल, अशी सर्वसामान्य अकोलेकरांना अपेक्षा आहे; परंतु मनपात सत्ताधारी व अधिकार्यांमधून विस्तवही जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. अशास्थितीत शहराचा विकास होईल किंवा नाही, या संभ्रमावस्थेत अकोलेकर आहेत. विकासाचे अनेक प्रस्ताव मनपात पडून आहेत. स्वतंत्र बांधकाम विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल) लागू नसल्यामुळे बांधकाम व्यवसायाला खिळ बसली आहे. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील पाचपैकी चार पम्प कालबाह्य झाल्याने त्यामध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत आहे. परिणामी शहराचा पाणीपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यासह विविध महत्त्वपूर्ण प्रस्ताव पाठपुराव्याअभावी मनपात पडून आहेत. असे प्रस्ताव निकाली काढण्यासाठी पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी पुढाकार घेतला. सुजल निर्मल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी सुधारणा कार्यक्रम राबवण्यासाठी मनपाने ४ कोटी ७३ लाखांचा प्रस्ताव यापूर्वीच शासनाकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव अधांतरी आहे. ह्यडीसीह्णरूलसह प्रलंबित प्रस्तावांवर उद्या ३ जानेवारीला पालकमंत्र्यांनी मुंबईत बैठकीचे आयोजन केले आहे.
अकोला मनपाचे प्रस्ताव; आज मुंबईत बैठक
By admin | Updated: January 3, 2015 01:25 IST