अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनता भाजी बाजार येथून प्रतिबंधित गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करीत असताना दहशतवादविरोधी कक्षाने त्यास अटक केली. या युवकाकडून ९० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
जनता भाजी बाजार परिसरातून अजय रघुनाथ शाहू हा त्याच्या दुचाकीवर राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक व विक्री करीत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी जनता भाजी बाजारात सापळा रचून अजय शाहू यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४५ हजार रुपयांचा गुटखा, एक दुचाकी असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी युवका विरूद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.