लोणार (बुलडाणा): येथील खार्या पाण्याच्या सरोवरापासून ५0 मीटर अंतरावर वन्यजीव अभयारण्य परिसरात वन विभागाच्या वरदहस्ताने खुलेआम गावठी दारूच्या भट्टय़ा सुरू असल्याचे वास्तव १४ मार्च रोजी लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे समोर आल्यानंतर आज सकाळी ७.३0 वाजतादरम्यान स्थानिक पोलिसांनी दारू भट्टीवर छापा मारून दारूची भट्टी नष्ट केली. तसेच गावठी दारू तयार करणार्या आरोपीला अटक केली असून, घटनास्थळावरून गावठी दारूसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.खार्या पाण्याच्या सरोवराच्या पायथ्याशी दक्षिणेस वन्य जीव अभयारण्य परिसरात अनेक दिवसां पासून घनदाट जंगलात चांद मिनू गाडीवाले रा. गवळीपुरा लोणार हा हात भट्टीतून गावठी दारू तयार करून विक्री करत होता. सदर गावठी दारूच्या भट्टय़ांचे १४ मार्च रोजी लोकमतने स्टिंग करून वास्तव समोर आणले. या वृत्ताची दखल घेत १५ मार्च रोजी सकाळी ७.३0 वाजेदरम्यान लोणार पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आकाश शिंदे, पीएसआय उकंडराव राठोड, प्रमोद खोब्रागडे, पोहेकाँ रमेश इंगळे, सुरेश काळे, महिला पोहेकाँ काळे यांनी लोणार मंठा रोडवर नाकाबंदी करून घटनास्थळी छापा मारून दारूभट्टी नष्ट केली. तसेच पीएसआय उकंडराव राठोड यांच्या फिर्यादीवरून आरोपी चाँद मिनू गाडीवाले यांच्या विरुद्ध अप नं. ५५/१६ कलम महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून घटनास्थळावरून ५ लीटर गावठी दारू, नगदी ५५0 रुपये हस्तगत केले.
सरोवर परिसरातील दारूभट्टी उद्ध्वस्त!
By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST