सस्तीनजीक पुलाची दुरवस्था; अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:17 AM2021-04-18T04:17:39+5:302021-04-18T04:17:39+5:30
खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी-वाडेगाव मार्गावरील सस्तीजवळील वघाडी नाल्यावरील पुलाची गेल्या काही महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अपघातात ...
खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी-वाडेगाव मार्गावरील सस्तीजवळील वघाडी नाल्यावरील पुलाची गेल्या काही महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अपघातात वाढ होत असून, अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
सस्तीनजीक पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात या मार्गावर अनेक वेळा वाहतूक तासनतास ठप्प होते. याकडे संबंधित व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने या परिसरातील ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पुलाची उंची वाढविण्यासाठी तसेच दयनीय अवस्था याबाबत संबंधिताकडे ग्रामस्थांनी वारंवार तक्रार केली; परंतु संबंधितांकडून अद्यापही दखल घेतली नसल्याने परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. अकोला, बाळापूर, पातूर, वाडेगावकडे जाण्यासाठी जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सावरगाव, चान्नी, चतारी, पिंपळखुटा, खेट्री, शिरपूर, चांगेफळ, राहेर, आडगाव, सायवणी, सुकळी, मळसुर, आदी गावांतील ग्रामस्थांसाठी हा एकमेव मार्ग असल्याने या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. सस्तीजवळील वघाडी नाल्यावरील पुलावर जागोजागी खड्डे पडल्याने मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे संबंधितांनी दखल घेऊन पुलाची दुरुस्ती व उंची वाढविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (फोटो)