अकोला: महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करणे काँग्रेस नगरसेवकांच्या अंगलट येण्याची चिन्ह आहेत. दिलीप देशमुख, रिजवाना शेख अजीज या दोन्ही नगरसेवकांचा अहवाल गटनेता साजिद खान यांनी पक्षाकडे सादर केल्यानंतर गुरुवारी रिजवाना शेख यांचे पती तथा अल्पसंख्याक काँग्रेस सेलचे महानगराध्यक्ष शेख अजीज यांची पक्षाने उचलबांगडी केली आहे. तसेच या मुद्यावर २२ मार्च रोजी मुंबईत बैठकीचे आयोजन केले आहे.मनपा स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून ज्येष्ठ नगरसेवक अब्दुल जब्बार यांना रिंगणात उतरविण्यात आले होते. सभापती पदासाठी १२ मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असता, काँग्रेसच्या चार नगरसेवकांपैकी दिलीप देशमुख, रिजवाना शेख अजीज यांनी ऐन वेळेवर मतदानाला अनुपस्थित राहणे पसंत केले. परिणामी अब्दुल जब्बार यांना स्वत:च्या मतासह काँग्रेस नगरसेविका साफिया खातून आझाद खान आणि भारिप-बमसंच्या दोन नगरसेवकांनी मतदान केले. निवडणूक ीत विजय अग्रवाल यांना आठ मते मिळाली तर काँग्रेसचे जब्बार यांना अवघी चार मते मिळाली. काँग्रेस नगरसेवक दिलीप देशमुख, रिजवाना शेख अजीज यांच्या अनुपस्थितीचा अहवाल गटनेता साजिद खान यांनी पक्षाकडे सादर केल्यानंतर गुरुवारी अब्दुल जब्बार यांनी रिजवाना शेख यांचे पती तथा काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे महानगराध्यक्ष अजीज शेख यांना पदावरून काढून टाकले आहे.
‘स्थायी’चे राजकारण काँग्रेस नगरसेवकांच्या अंगलट
By admin | Updated: March 18, 2016 02:12 IST