अकोला : अनधिकृत फलक, झेंडे, नामफलक, होर्डिंग्ज काढण्यासाठी मंगळवारी पोलिसांनी मोहीम सुरू केली. या मोहिमेंतर्गत बुधवारीसुद्धा पोलीस व महापालिकेने सिंधी कॅम्प, खदान परिसरात कारवाई करून अनधिकृत फलक, झेंडे, दुकानांवरील बोर्ड काढून टाकले. ही कारवाई दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू होती.शहरातील खदान, सिंधी कॅम्प परिसरातील इमारती, दुकानांवरील फलकांसह चौकातील नामफलक, झेंडे, पताका तसेच रस्त्यावर केलेले दुकानांचे अतिक्रमण बुधवारी पोलीस पथक व महापालिकेने गजराजाच्या माध्यमातून हटविले. सिंधी कॅम्प परिसरात पथक दाखल होण्यापूर्वी सामाजिक व धार्मिक संघटनेचे पदाधिकारी, नागरिक व व्यापार्यांनी त्यांच्या दुकाने, इमारतींवरील फलक, झेंडे, पताका स्वत:हून काढून टाकले. मंगळवारी पथकाने धडाक्यात मोहीम राबवून अनधिकृत फलकांच्या विळख्यातून परिसराची मुक्तता केली. पोलीस पथक व महापालिकेने शहरातील जठारपेठ, राऊतवाडी, रणपिसेनगर, रामनगर, जवाहरनगर, रामदासपेठ, रेल्वे स्टेशन, निबंधे प्लॉट, लहान उमरी, वृंदावननगर, बसस्टँड, अशोक वाटिका, गोरक्षण रोड, इन्कमटॅक्स चौक, तुकाराम चौक, मलकापूर, गौतमनगर, कृषिनगर, कौलखेड, शिवणी, खरप, खडकी, भौरद, न्यू तापडियानगर, डाबकी रोड, जुने शहर, हरिहरपेठ, वाशिम बायपास, बाळापूर नाका आदी भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात रस्त्यांवर झेंडे, पताका, चौकांमधील नामफलक आहेत. यासोबतच इमारती, दुकाने, विद्युत खांब, वृक्षांवर बॅनर, होर्डिग्ज लावण्यात आले आहेत. या भागांमध्येही टप्याटप्प्याने मोहीम राबवून अनधिकृत फलक काढण्याची मागणी होत आहे.
दुस-या दिवशीही पोलिसांची कारवाई
By admin | Updated: January 8, 2015 00:44 IST