अकोला : शहरातील गांधी रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहसमोरील रस्त्यावर, कालाचबुतरा परिसरात फटाक्यांची अवैध विक्री करणार्यांविरुद्ध खदान व कोतवाली पोलिसांनी बुधवारी फौजदारी कारवाई केली आणि त्यांच्याकडील ५५ हजार रुपयांचे फटाके जप्त केले. बुधवारी ह्यलोकमतह्णने रस्त्यांवर फटाके विक्री होत असल्याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. दिवाळीनिमित्त खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असताना, एखाद्या फटाका विक्रीच्या दुकानात दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पृष्ठभूमीवर महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी रस्त्यांवर फटाके विक्री करणार्यांविरुद्ध कारवाई करणे अपेक्षित होते; परंतु पोलिसांनी व मनपाने दखल घेतली नाही. ह्यलोकमतह्णमध्ये वृत्त प्रकाशित होताच, पोलिस कामाला लागले आणि त्यांनी बाजारपेठेमध्ये गस्त घालून रस्त्यांवर फटाके विक्री करणारे सैयद फैयाज सैयद शिराज अली, सैयद अन्वर सैयद बशीर, जमील अहमद अब्दुल मुनाफ, मजहर खान जाफर खान, नसीर अहमद अब्दुल मुनाफ आणि अजहर खान जफर खान यांच्यासह आणखी दोघांवर फौजदारी कारवाई करून त्यांच्याकडील ५५ हजार रुपयांचे फटाके जप्त केले. पोलिसांची ही मोहीम गुरुवारीसुद्धा सुरू राहणार आहे. ही कारवाई कोतवाली पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनिरुद्ध आढाव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
फटाका विक्रेत्यांवर पोलिस कारवाई
By admin | Updated: October 23, 2014 02:10 IST