अकोला, दि. ५- पती, पत्नीच्या कौटुंबिक वादामध्ये त्यांची समजूत काढण्याचा पोलिसांकडून प्रयत्न होत असतानाच पतीने अचानक खिशात आणलेले ब्लेड काढून हातावर सपासप वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी दुपारी डाबकी रोड पोलीस ठाण्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. डाबकी रोडवरील मेहरे नगरात राहणार्या दाम्पत्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली. सासरच्या मंडळींनी पत्नीला घेऊन गेल्याची तक्रार देण्यासाठी पती डाबकी रोड पोलीस ठाण्यात आले. पतीने सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार घेण्याची पोलिसांना विनंती केली. पोलिसांनी सासरच्या मंडळींना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. दोन्ही बाजूची चौकशी पोलिसांनी सुरू केली आणि पती, पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु दरम्यान पती, पत्नीमध्येच वाद सुरू झाला. या वादामुळे संतप्त झालेल्या पतीने खिशातील ब्लेड काढले आणि हातावर सपासप वार करून स्वत:ला जखमी केले. अचानक घडलेल्या घटनेमुळे पोलीसही चक्रावून गेले. त्यांनी तातडीने पतीला सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पतीविरुद्ध पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला.
पोलीस ठाण्यातच ब्लेड मारून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न!
By admin | Updated: February 6, 2017 02:36 IST