संतोष मुंढे / वाशिमस्वच्छतेसाठी सरकारने हाती घेतलेल्या अभियानात जिल्हा प्रशासन, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे योगदान कसे आहे, यावर विभागीय आयुक्तांची करडी नजर राहणार आहे. या मोहिमेसाठी वेळोवेळी केलेल्या उपक्रमांचा ऑनलाईन अहवाल आयुक्त कार्यालय मागविणार असून, त्याचा विभाग स्तरावर आढावाही घेतला जाणार आहे.२ ऑक्टोबर २0१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हातात झाडू घेऊन भारत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ केला. स्वच्छता अभियानात योगदान देण्याचे आवाहन त्यांनी सकल जनांना केले. प्रशासकीय यंत्रणाही याकामी लावण्यात आली असून, २ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान स्वत:चे कार्यालय व परिसर स्वच्छ करण्याची मोहीम प्रायोगिक तत्त्वावर हाती घेण्यात आली. या मोहिमेस व्यापक स्वरूप देण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना दिशानिर्देशित करण्यात आले होते. याबाबत २१ ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्तांकडून प्रगती अहवाल घेतल्यानंतर ही मोहीम आणखी गतिमान करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी जिल्हा पातळीवरुन अहवाल मागविण्याचे काम सुरु केले आहे. २९ ऑक्टोबर रोजी अमरावती विभागीय आयुक्त हे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिमचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच अमरावती आणि अकोला महानगरपालिका आयुक्त आणि उपआयुक्तांकडून एकूणच कामाचा आढावा घेणार आहेत.राज्यपाल, विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार स्वच्छता अभियानाला गती देण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबरपासून अभियान आणखी गतिमान करण्याचा अँक्शन प्लॅन तयार असून, अभियानाबाबत कुचराई आढळून आल्यास दोषींवर तत्काळ कारवाई केली जाणार असल्याचे वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगीतले.
जिल्हा स्तरावरून मागविणार ऑनलाईन अहवाल
By admin | Updated: October 29, 2014 01:29 IST