अकोला: घरफोडी करून हजारो रुपयांचा ऐवज लंपास करणार्या दोघा घरफोड्यांना मंगळवारी न्यायदंडाधिकारी काळे यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्यांच्या आधारावर एक वर्षाच्या सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. कौलखेड परिसरातील नागे ले-आउटमध्ये राहणारे संजय मधुकरराव ठाकरे हे २७ जून २0१४ रोजी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा व माचपाडा गावात राहणारे सुखचंद जाफर शेख (२३) व त्याचा सहकारी मोहसीन शेख मोसलीन शेख (३६) यांनी ठाकरे यांचे घर फोडून हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. खदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक टिकाराम थाटकर यांनी घरफोडीचा तपास करून आरोपी सुखचंद व मोहसीन यांना अटक केली. आरोपी अद्यापही कारागृहात आहेत. पीएसआय थाटकर यांनी याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायदंडाधिकारी काळे यांच्या न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. आरोपींविरुद्ध सबळ पुरावे मिळून आल्याने न्यायालयाने दोघांनाही एक वर्षाचा सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याचा कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे साहाय्यक सरकारी विधिज्ञ सिद्धार्थ साबळे यांनी बाजू मांडली.
अट्टल घरफोड्यांना एक वर्षाचा कारावास
By admin | Updated: February 4, 2015 01:44 IST