अकोला: पंतप्रधान जन-धन योजनेंतर्गत गेल्या अडीच महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात १ लाख ९ हजार ७६८ व्यक्तींचे बँक खाते उघडण्यात आले असून, बँकेत खाते नसलेल्या कुटुंबांचे खाते उघडण्यासाठी बँकांकडून जिल्ह्यात कुटुंबनिहाय सर्वेक्षण करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १५ ऑगस्ट रोजी ह्यजन-धनह्ण योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबांचे बँकेत खाते उघडण्यात आले नाही, अशा कुटुंबातील व्यक्तींचे बँक खाते उघडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत अकोला जिल्ह्यात ज्या व्यक्तींचे बँक खाते उघडण्यात आले नाही, अशा व्यक्तींचे बँक खाते उघडण्याचे काम जिल्ह्यातील २३ बँकांकडून गेल्या १६ ऑगस्टपासून सुरू करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व खासगी बँकांमध्ये नागरिकांचे बँक खाते उघडण्यात येत आहेत. १६ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर या अडीच महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात एक लाख ९ हजार ७६८ व्यक्तींचे बँक खाते उघडण्यात आले. बँकांमार्फत बँक खाते उघडण्यात आलेल्या व्यक्तींचा बँक खाते क्रमांक आधार कार्ड क्रमांकाशी जोडल्यानंतर खातेदारांना ह्यरुपे कार्डह्ण दिले जात आहे. रुपे कार्डचा वापर सुरू करणार्या बँक खातेदारांचा एक लाखांचा विमा उतरविण्यात येत असून, या विमा हप्त्याची रक्कम केंद्र सरकारकडून जमा केली जात आहे. ज्यांचे बँक खाते उघडले नाही, अशा जिल्ह्यातील सर्व कुटुंबप्रमुख पुरुष किंवा महिलांचे बँक खाते येत्या २६ जानेवारीपर्यंत उघडण्याचे नियोजन जिल्हा अग्रणी बँक असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्यावतीने करण्यात आले आहे.
९९१ गावांमध्ये सर्वेक्षण!
बँक खाते उघडण्यात आले नाही, अशा व्यक्तींचा शोध घेऊन, त्यांचे बँकेत खाते उघडण्यासाठी गेल्या १६ ऑगस्टपासून, जिल्ह्यात २३ बँकांकडून ९९१ गावांमध्ये कुटुंबनिहाय सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात बँकेत खाते उघडले नसलेल्या कुटुंबप्रमुखांची माहिती घेतली जात आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत बँकांकडून हे सर्वेक्षणाचे काम करण्यात येणार आहे.