अकोला: पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर अकोला शहरासाठी मोर्णा धरण ते महान येथील जलशुद्धीकरण केंद्र आणि महान ते खांबोरा आणि चोहोट्टा बाजार ते घुसर जलवाहिनी टाकणे, या तीन पाणीपुरवठा योजनांचे सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी शुक्रवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला शुक्रवारी दिले. पाणीटंचाई योजनांच्या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी अधिकार्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय धोत्रे, आ.रणधीर सावरकर, आ.हरीश पिंपळे, आ.बळीराम सिरस्कार, महापौर उज्ज्वला देशमुख, जिल्हाधिकारी अरुण शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता (ठाणे) हेमंत लांडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे, अपर जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त शिवाजी दिवेकर, मजीप्राचे अधीक्षक अभियंता गणेश गोखले, कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपूलवार प्रामुख्याने उपस्थित होते. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्याने, शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पृष्ठभूमीवर अकोला शहराला मोर्णा धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी मोर्णा धरण ते महान येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याची २७ कोटींची आकस्मिक योजना, तसेच खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांसह मूर्तिजापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणापासून खांबोरापर्यंत जलवाहिनी टाकण्याची २४ कोटींची योजना आणि खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ४४ गावांना पाणीपुरवठय़ासाठी चोहोट्टा बाजार ते घुसरपर्यंत जलवाहिनी टाकण्याची ५ कोटी ४९ लाखांची योजना या तीन पाणीपुरवठा योजनांचे सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. त्यामध्ये महान ते खांबोरा आणि मोर्णा धरण ते महान या दोन योजनांचा नवीन प्रस्ताव राज्य शासनाकडे तर खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत चोहोट्टा बाजार ते घुसर योजनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्याच्या सूचना राजूरकर यांनी मजीप्राच्या अधिकार्यांना दिल्या. जिल्ह्यातील प्रस्तावित पाणीपुरवठा योजनांबाबत विभागीय आयुक्तांनी उपस्थित लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केली.
पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव द्या!
By admin | Updated: January 3, 2015 01:28 IST