- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अकोला जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यात रास्त भाव दुकानांमधील ‘ई-पॉस’मशीन ९ ते १३ डिसेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत बंद पडल्याने शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण करण्यात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे १४ डिसेंबरपर्यंत लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना धान्याच्या लाभापासून वंचित राहावे लागल्याने, दरमहा ८ ते १५ तारखेपर्यंत सर्व शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण करण्याचा अन्न सप्ताह साजरा करण्याचा फज्जा उडाला आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अंत्योदय योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गट आणि एपीएल शिधापत्रिकाधारकांना दरमहा रास्त भाव दुकानांद्वारे धान्याचे वितरण करण्यात येते. शिधापत्रिका आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आलेल्या शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानांमधील ‘ई-पॉस’ मशीनद्वारे धान्याचे वितरण करण्यात येते; परंतु सर्व्हर डाऊन झाल्याने, अकोला जिल्ह्यासह राज्यातील इतरही जिल्ह्यात रास्त भाव दुकानांमधील ‘ई-पॉस’ मशीन ९ ते १३ डिसेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत बंद पडल्या होत्या.त्यामुळे पाच दिवस शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण करण्यात खोडा निर्माण झाला होता. १४ डिसेंबरपासून ई-पॉस मशीन सुरू झाल्यानंतर धान्याचे वितरण पूर्ववत सुरू करण्यात आले. दरमहा ८ ते १५ तारखेपर्यंत शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्यासाठी पुरवठा विभागामार्फत गतवर्षीपासून अन्न सप्ताह साजरा करण्यात येत असला तरी, ई-पॉस मशीन बंद पडल्याने गत पाच दिवसांत धान्याचे वितरण रखडल्याने, शिधापत्रिकाधारकांना धान्याच्या लाभापासून वंचित राहावे लागले.त्यामुळे ८ ते १५ तारखेपर्यंत सर्व शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्याचा अन्न सप्ताह पुरवठा विभाग साजरा करणार कसा, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
रास्त भाव दुकानांमधील ‘ई-पॉस’ मशीन ९ ते १३ डिसेंबर या कालावधीत बंद पडल्या होत्या. त्यामुळे पाच दिवस धान्याचे वितरण बंद होते. ई-पॉस मशीन सुरू झाल्यानंतर १४ डिसेंबरपासून शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण सुरू करण्यात आले.-शत्रुघ्न मुंडेराज्य उपाध्यक्ष, रास्त भाव दुकानदार संघटना