खामगाव (जि. बुलडाणा) : उद्योग, व्यवसायाच्या बदलल्या कौशल्यानुसार विविध विषयाच्या अनुषंगाने अधिक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी परिणामकारक समन्वय साधता यावा, यासाठी केंद्र शासनाचा स्वतंत्र कौशल्य विकास व उद्योजकता विभाग आहे. याच धर्तीवर राज्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे नामकरण कौशल्य विकास व उद्योजकता विभाग असे करण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ जानेवारी रोजी घेतला आहे. रोजगाराच्या बदलत्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिस्थितीत कौशल्य विकासावर अधिक भर देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या पृष्ठभूमिवर केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यामध्ये देखील स्वतंत्र कौशल्य विकास व उद्योजकता विभाग असावा व विविध विभागांकडील विषयांच्या अनुषंगाने अधिक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी परिणामकारक समन्वय साधता यावा असा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. राज्यात यापूर्वी रोजगार व स्वयंरोजगार असा स्वतंत्र मंत्रालय विभाग १९९७ मध्ये निर्माण करण्यात आला आहे. या विभागाचे नाव कौशल्य विकास व उद्योजकता विभाग असा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे कौशल्य विकास व उद्योजकता विभाग असे नामकरण झालेल्या विभागासाठी प्रधान सचिव श्रेणीतील एक पद नव्याने निर्माण करण्याचा व त्या पदावर भारतीय प्रशासन सेवेतील अधिकार्यांची नियुक्ती करण्याचा देखील शासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे कामकाज नव्या नामकरणानुसार चालणार आहे.
रोजगाराच्या संधीसाठी आता कौशल्य विकास व उद्योजकता विभाग
By admin | Updated: January 20, 2015 00:28 IST