अकोला: जिल्हय़ातील ५0 पैशांपेक्षा कमी किंवा अंतिम पैसेवारी असलेल्या दुष्काळग्रस्त गावांमधील इयत्ता दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क शिक्षण विभागाने माफ केले. त्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना दुष्काळगस्त गावांमधील विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक मागितले; परंतु आतापर्यंत पाच ते सहा शाळांनीच बँक खाते दिले. उर्वरित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी खाते न दिल्याने जिल्हय़ातील ९९७ शाळांमधील विद्यार्थ्यांनी भरलेले शिक्षण शुल्क परत मिळालेले नाही. जिल्हय़ातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना भारत सरकारची शिष्यवृत्ती प्राप्त करणारे विद्यार्थी वगळून इतर विद्यार्थ्यांची माहिती पाठविण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षण विभागाने तीन महिन्यांपूर्वीच दिल्या होत्या. अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक एस.आर. कुळकर्णी यांनी सर्व मुख्याध्यापकांना पत्र पाठवून खरीप हंगामातील ५0 पैशांपेक्षा कमी किंवा अंतिम पैसेवारी असलेल्या दुष्काळसदृश गावांमधील विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करण्यात आल्याचे कळविले होते आणि त्यानुसार अकोला जिल्हय़ातील ९९७ दुष्काळसदृश गावांमधील विद्यार्थ्यांंचे शिक्षण शुल्क माफ करण्यात आले. जिल्हय़ातील अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित विद्यालयांतील २0१५-१६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले असल्यामुळे विद्यार्थ्यांंची यादी (ज्या विद्यार्थ्यांंनी परीक्षा शुल्क भरले आहे), बँक खाते शिक्षण विभागाने मागितले होते. तीन महिन्यांचा कालावधी उलटूनसुद्धा जिल्हय़ातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाने दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंची माहिती शिक्षण विभागास सादर केली नाही. त्यामुळे शिक्षण शुल्क माफ होऊनही विद्यार्थ्यांंना त्यांचे शिक्षण शुल्क परत मिळू शकलेले नाही. दरम्यान, या संदर्भात कुठल्याही विद्यार्थी संघटनेने आवाज उठविला नाही.
९९७ गावांमधील एकाही विद्यार्थ्याला मिळाले नाही शिक्षण शुल्क
By admin | Updated: July 27, 2016 01:42 IST