अकोला: महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे व स्थानिक अधिकार्यांवर तत्कालीन मुख्य लेखापरीक्षक जे.एस. मानमोठे यांच्या चौकशी अहवालामुळे संकट ओढवले; मात्र अग्निशमन विभागामार्फत मॅक्सीन कॉर्पोरेशन कंपनीचा करारनामा का रद्द केला, या संदर्भात मुख्य लेखापरीक्षक मानमोठे यांना चौकशी करण्याचे लेखी आदेश कोणीही दिलेच नसल्याचा खळबळजनक दावा अग्निशमन विभाग प्रमुख रमेश ठाकरे यांनी केला. त्यामुळे मुख्य लेखापरीक्षकांचा चौकशी अहवालही वादाच्या भोवर्यात सापडला आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागातील वाहनांची देखभाल दुरुस्ती करण्याचा कंत्राट मिळालेल्या शहरातील मॅक्सीन कॉर्पोरेशन कंपनीने तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे, सहायक आयुक्त राजेंद्र घनबहाद्दूर,अग्निशमन विभाग अधिकारी रमेश ठाकरे व कर्मचारी मनीष कथले यांनी थकीत देयक अदा करण्याच्या बदल्यात २0 टक्के दलाली मागितल्याप्रकरणी स्थानिक न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी न्यायालयाने डॉ. कल्याणकर यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिल्यानंतर प्रकरणाची सारवासारव करण्यासाठी मनपाच्या प्रशासकीय यंत्रणेची धावपळ सुरू झाली आहे. मॅक्सीन कंपनीचा पुरवठा आदेश व करारनामा रद्द केल्याप्रकरणी तत्कालीन मुख्य लेखापरीक्षक जे.एस. मानमोठे यांनी चौकशी केली. तत्कालीन आयुक्त सोमनाथ शेटे यांना ८ मे २0१५ रोजी चौकशी अहवाल सादर केला. यामध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. कल्याणकर, उपायुक्त डॉ. गुटे यांच्यासह राजेंद्र घनबहाद्दूर, रमेश ठाकरे व मनीष कथले यांना थेट दोषी ठरवल्याचे नमूद आहे. संबंधित दोषी अधिकार्यांविरुद्ध त्वरित कार्यवाही करून कंपनीचा करारनामा पूर्ववत सुरू करण्याचा शेरा मुख्य लेखापरीक्षक जे.एस. मानमोठे यांनी दिला; परंतु सदर प्रकरणी मुख्य लेखापरीक्षक मानमोठे यांना चौकशी करण्याचे कोणीही आदेश दिला नसल्याचा दावा अग्निशमन विभाग प्रमुख रमेश ठाकरे यांनी करीत मुख्य लेखापरीक्षकांचा चौकशी अहवाल संशयास्पद असल्याचे सांगितले.
लेखी आदेश नाहीत; तरीही केली चौकशी !
By admin | Updated: July 27, 2016 02:01 IST