माझोड : अकोला पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या माझोड येथे जवळपास ६७ लाख रुपयांच्या पेयजल योजनेचे काम सुरू आहे; परंतु सदर योजनेत पाण्याची साठवण करण्यासाठी जलकुंभच नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे जलकुंभाविना नळ योजना अस्तित्वात येऊ शकते का, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. माझोड येथील पाणी प्रश्न कायमचा मिटावा, यासाठी तत्कालिन जिल्हा परिषद प्रशासनाने येथे पेयजल योजना मंजूर केली. सदर योजनेचे काम यावर्षी करण्यात येत आहे. यासाठी कापशी तलावानजीक विहीर खोदण्यात आली. त्यामुळे पाणी कमी पडणार नाही, असे चित्र आहे. या योजनेंतर्गत गावात टाकण्यात आलेली पाईपलाईन जुन्या टाकीवरच जोडण्यात येत आहे. जलस्वराज योजनेची ही टाकी आधीच निकृष्ट दर्जाची आहे. या टाकीत पाणी सोडण्यात आले, तेव्हाच तिला गळती लागली होती. त्यामुळे जलस्वराज योजनेचा पाणीपुरवठाही गावातील दुसर्या टाकीत सोडण्यात आला होता. आता या टाकीचे बांधकाम ३० वर्षांपूर्वीचे असल्यामुळे ती जास्त दिवस टिकणार नाही. तर जलस्वराज योजनेची टाकी पूर्णपणे लिकेज आहे. अशा परिस्थितीत पेयजल योजनेसाठी गावात स्वतंत्र टाकी बांधली जाईल, अशी अपेक्षा गावकर्यांना होती. परंतु, जुन्या टाकीवरच ही योजना राबविण्यात येणार असल्यामुळे, या योजनेंतर्गत जलकुंभ बांधण्यासाठी मिळालेला पैसा गेला कुठे, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. जलकुंभाविना योजना मंजूर झाली कशी, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
पेयजल योजनेला जलकुंभच नाही
By admin | Updated: May 15, 2014 20:26 IST