संतोष येलेकर/नितीन गव्हाळे अकोला :जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये पानठेले, किराणा दुकान, वाहन सर्व्हिसिंग सेंटरवर खुलेआम अवैध पेट्रोलची विक्री होत असल्याचे ह्यलोकमतह्ण चमूने केलेल्या स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस आले आहे. शेकडो गावांमधील पानठेले, किराणा दुकाने पेट्रोल विक्रीचे अड्डे बनलेत. या ठिकाणांवर खुलेआम बिसलेरी बाटल्यांमध्ये पेट्रोलची विक्री केली जाते. या विक्रीतून हजारो ग्राहकांची फसवणूकसुद्धा केल्याचे प्रकार घडत आहेत. गावपासून पेट्रोल पंप २५ ते ३0 किलोमीटर लांब असल्याने ग्रामस्थांना मोटारसायकल घेऊन तेथपर्यंत जाणे परवडत नाही. मोटारसायकलमध्ये पेट्रोल पंपापर्यंत जाण्याइतपत पुरेसे पेट्रोल नसते. त्यामुळे अनेक जण गावातीलच पानठेले, किराणा दुकानांवरूनच पेट्रोल घेतात. ग्रामस्थांच्या याच अडचणीचा फायदा घेऊन पेट्रोल विक्रीच्या अवैध धंद्याला गावोगावी चांगलाच ऊत आला आहे. तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे असेल, तर ग्रामीण भागातील मोटारसायकलस्वार २५ ते ३0 किमी अंतरावरील पेट्रोल पंपावर जाणे टाळतात आणि गावातील पानठेले, किराणा दुकान येथून पेट्रोल विकत घेतात. गावागावांत मागणी वाढत असल्याने पानठेला मालक, दुकानदार पेट्रोल, डिझेलचा मोठा साठा करून ठेवतात. त्याच्या सुरक्षेकडेही दुर्लक्ष होते. २५ ते ३0 लीटरच्या कॅनमध्ये हे विक्रेते पंपांवरून पेट्रोल आणतात. काही जण मोटारसायकलची टाकी आणि सोबत असलेली कॅन पाच ते सहा लीटरने भरून आणतात. नंतर मोटारसायकलमधील पेट्रोल काढून त्याची विक्री करतात. ७0 रूपयांच्या एक लीटर पेट्रोलमागे हे विक्रेते सरसकट २0 ते ३0 रुपये अधिक आकारतात. मोटारसायकलमधील पेट्रोल संपले, दूरवरील पेट्रोल पंपापर्यंत जाणे शक्य होत नसल्याने विक्रेतेही त्याचा फायदा उचलतात आणि मोटारसायकलस्वारही कोणते आढवेढे न घेता, एक लीटर पेट्रोलमागे ९0 ते १00 रुपये मोजतात. त्यातही पेट्रोल मोजण्याचे माप नसल्याने लीटरमागे कमीच पेट्रोल मिळत असल्याने यातही वाहनधारकांची फसवणूक होत असल्याचे आढळून आले.
पानठेले नव्हे, पेट्रोल विक्रीचे अड्डे!
By admin | Updated: January 9, 2015 01:47 IST