अकोला : शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये तातडीने मदत देण्याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या सभेत जिल्ह्यातील नऊ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. सहा शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली असून, एका प्रकरणात फेरचौकशीचे निर्देश देण्यात आले. जिल्हास्तरीय समितीच्या सभेत जिल्ह्यातील एकूण १६ शेतकरी आत्महत्या प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी नऊ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. त्यामध्ये पातूर तालुक्यातील सांगोळा येथील निर्मला गणेश ठाकरे, चतारी येथील पार्वता आकाराम सरदार, आकोट तालुक्यातील रामापूर येथील श्रीकृष्ण मनीराम मडावी, बाळापूर तालुक्यातल्या वाडेगाव येथील अभिजित नारायण सोनोने, पातूर तालुक्यातील बाळू सदाशिव वानखडे, बेलुरा बु. येथील डिगांबर सूर्यभान निंबोकार, बाश्रीटाकळी तालुक्यातल्या पिंपळखुटा येथील मोहन बाबूराव क्षीरसागर, कोथळी बु. येथील भिकाजी रामहरी झळके व चिंचोली रुद्रायणी येथील किसन श्यामराव सानप इत्यादी ९ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली, तर सहा शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीस अपात्र ठरविण्यात आली असून, एक शेतकरी आत्महत्या प्रकरणात फेरचौकशी करण्याचे निर्देश समितीने दिले. अपर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, समितीचे सदस्य शिवाजीराव देशमुख,आकोट व बाळापूर पंचायत समितीचे सभापती व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
शेतकरी आत्महत्यांची नऊ प्रकरणे मदतीसाठी पात्र
By admin | Updated: December 23, 2014 00:41 IST