लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : यापूर्वी अनेक सूतगिरण्या सुरू झाल्या व बंद पडल्या; परंतु नीळकंठ सपकाळ सह. सूतगिरणी पुन्हा सुरू झाल्यास ती शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला निश्चितच बाजारभावापेक्षा जास्त भाव मिळेल व सूतगिरणी नफ्यात राहील, याची हमी देत असल्याने सूतगिरणी सुरू करण्याकरिता जे जे सहकार्य करतील त्यांचे व येणाऱ्या पिढीचे भविष्य उज्ज्वल राहील, असे प्रतिपादन खासदार संजय धोत्रे यांनी केले. ते तेल्हारा येथील शेतकरी मेळाव्यामध्ये बोलत होते.कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक संदीप खारोडे यांनी नगर परिषदेच्या अटलबिहारी वाजपेयी सभागृहात दि नीळकंठ सपकाळ सह. सूतगिरणी अकोलाचे संचालक या नात्याने शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. याकरिता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेशदादा तराळे तर प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, नीळकंठ सह. सूतगिरणीचे अध्यक्ष डॉ. रणजित सपकाळ, संचालक श्रीराम कुकडे, संदीप खारोडे, नगराध्यक्ष जयश्री पुंडकर, नयनाताई मनतकार, डॉ. केशवराव अवताडे यांची उपस्थिती होती. संजय धोत्रे यांनी शेतकरी संघटित होऊन जर काम करीत असतील तर यश निश्चितच येणार. तेल्हारा तालुका हा चांगल्या प्रतिचा कापूस पिकविण्यामध्ये प्रथम आहे. त्याच्या कापसाला भाव जर चांगला मिळाला, तर निश्चित शेतकऱ्यांची प्रगती होईल. सूतगिरणी नफ्यात राहणार असल्याने भागधारकांना लाभांषसुद्धा मिळेल. शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यास पश्चात्तापाची वेळ येणार नाही, त्यामुळे सूतगिरणीचे भागधारक व्हा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सूतगिरणीचे अध्यक्ष डॉ. रणजित सपकाळ यांनी सूतगिरणीच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत विस्तृत माहिती दिली. संचालन अॅड. गजानन तराळे व आभार बाजार समिती सभापती सुरेश तराळे यांनी मानले. यावेळी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक व विविध राजकीय पक्षांचे व आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूतगिरणी झाल्यास शेतकऱ्यांचा फायदा - आ. सावरकरआज या स्पर्धेच्या युगामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना सहकार क्षेत्रामधील बँका व विविध कार्यकारी सोसायट्या यामध्ये व्यवहार करणे जेवढे सहज शक्य झाले आहे, तेवढे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये नाही, त्यामुळे सहकारी सूतगिरणी सुरू झाल्यास शेतकऱ्यांना याचा फायदा मिळेल, असे आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले.
नीळकंठ सूतगिरणी शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार - धोत्रे
By admin | Updated: May 16, 2017 01:58 IST