लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारा संचालित राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेची विदर्भ प्रांतीय कार्यशाळा शनिवार, १५ जुलै रोजी बुलीचंद राठी मूकबधिर विद्यालय, साई नगर, अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, भविष्यात उत्तम वैज्ञानिक तयार व्हावेत, या दृष्टिकोनातून शालेय विद्यार्थ्यांना लघुशोध प्रकल्प सादर करण्यासाठी प्रेरित केले जाते. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर यांची मान्यता लाभलेल्या या उपक्रमांतर्गत यंदा विद्यार्थ्यांना ‘शाश्वत विकासासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि कल्पकता’ या विषयावर लघुशोध प्रकल्प सादर करावे लागणार आहेत.यापूर्वी संस्थेची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल ‘श्रेय जिज्ञासा ट्रस्ट’ ठाणे व ‘कुतूहल’ संस्था, अकोला यांच्यावतीने ‘सृष्टी वैभव’चे संचालक उदय वझे यांची अमरावती, अकोला व वाशिम या तीन जिल्ह्यांसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकल्पाचा पहिल्या टप्पा म्हणून विदर्भातील सर्व जिल्हा समन्वयक तथा विद्यार्थी, पालक व शिक्षकांची एकत्रित कार्यशाळा शनिवारी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० दरम्यान अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे. तिन्ही जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी कार्यशाळेला उपस्थित राहावे, असे आवाहन उदय वझे यांनी केले आहे. लवकरच अकोला आणि वाशिम येथेसुद्धा अशा कार्यशाळा आयोजित केल्या जाणार असल्याची माहिती उदय वझे यांनी ‘लोकमत’ला दिली.
राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेची कार्यशाळा
By admin | Updated: July 14, 2017 01:58 IST