मलकापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोपानराव साठे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या तालुक्यातील नरवेल या जिल्हा परिषद मतदार संघाची पोटनिवडणूक १0 जानेवारीला होतेय. विद्यमान परिस्थितीत राष्ट्रवादी सोडून इतर पक्ष उमेदवारी टाळण्यासाठी सध्यातरी शांत दिसत आहेत; मात्र साठे यांच्या वारसदारात चढाओढ असल्याने ज्येष्ठ नेते डॉ.राजेंद्र शिंगणेंनी सोमवारी मलकापुरात भेट देऊन आढावा घेतला.मध्यंतरी साठे यांचे निधन झाले. त्यामुळे या गटाची पोटनिवडणूक होत आहे. यासाठी मतदान १0 जानेवारी रोजी होऊन निकाल ११ जानेवारीला जाहीर होईल. २१ ते २८ डिसेंबरदरम्यान नामांकन अर्ज दाखल होतील. एसडीपीओ कार्यालयात प्रक्रिया पार पडली. स्व. सोपानराव साठे यांच्याप्रती सहानुभूती असल्याने भाजप, काँग्रेस, शिवसेना या प्रमुख विरोधी पक्षांकडे सध्यातरी प्रतिस्पर्धी उमेदवार नाहीत; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोपानराव साठे यांच्या वारसात ताण निर्माण झाल्याचे दिसते. साठे यांच्या ज्येष्ठ कन्या दसरखेडच्या माजी सरपंच मंगला लांडे यांनी उमेदवारी दावा केलाय तर कनिष्ठ कन्या अश्विनी काकडे यांनीही उमेदवारीसाठी दावा केला आहे. परिवारातील हा वाद शमविण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे मलकापुरात दाखल आहेत. पक्षनेते संतोष रायपुरे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेते दत्ता महाजन यांच्या निवासस्थानी त्या विषयावर चर्चा सुरु असल्याची माहिती असून, हा वाद कायम राहिल्यास प्रतिस्पर्धी पक्ष रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)
नरवेल जि.प.सर्कलची १0 जानेवारीला पोटनिवडणूक
By admin | Updated: December 22, 2015 16:46 IST