बाश्रीटाकळी (अकोला): केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर निष्क्रिय ठरले आहे. धर्माच्या नावावर निवडून आलेले हे सरकार लुटारूंचे असल्याची टीका भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी कार्यकर्ता मेळाव्यात केली. गतवर्षी जागतिक बाजारपेठमध्ये कच्च्या तेलाचे दर ( क्रुड ऑईल) ११0 डॉलर प्रती बॅरल होते. सध्या हेच दर २९ डॉलर प्रती बॅरल आहे. त्याअनुषंगाने डिझेल प्रती १८ रुपये व पेट्रोल २६ रुपये प्रतीलिटर असायला हवे; मात्र प्रत्यक्षात तसे नाही. सरकार कंपन्याच्या माध्यमातून लोकांना लुटत आहे, असा आरोप त्यांनी केला. अँड. आंबेडकर यांनी राज्य सरकारचाही समाचार घेतला. राज्याचे मंत्री, आमदार मुंबई सोडून मतदारसंघात यावयास तयार नाहीत. कदाचित दुष्काळाबाबत लोकांना किती थापा माराव्या, याचा विचार त्यांना पडला असावा, असा टोलाही त्यांनी लगावला. कितीही मोर्चे, आंदोलने केली तरी उपयोग नाही; मात्र आमचा लढा सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, जिल्हा परिषद सदस्या प्रतिभा प्रभाकर अवचार यांनी यावेळी भारिप-बमसंमध्ये प्रवेश केला.
धर्माच्या नावावर लुटारूंचे सरकार सत्तेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2016 01:58 IST