अकोला: आत्महत्या करणार्या शेतकर्यांच्या कुटुंबांना व विधवा महिलांना दिलासा आणि मदतीचा हात देण्यासाठी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी नाम फाउंडेशन स्थापन केले आहे. नामतर्फे राज्यातील शेतकर्यांच्या विधवा पत्नी व कुटुंबांना मदत देण्याचे काम सुरू आहे. रविवारी अकोला जिल्ह्यातील ३५ विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप करू न नाम फाउंडेशनने स्वयंरोजगार उभारणीला हातभार लावला. श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांनी विधवा शेतकरी महिलांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारत असल्याची येथे घोषणा केली. अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयातील वसंत सभागृहात आयोजित कार्यक्रमात शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार होते. नामचे विदर्भ व खान्देशचे समन्वयक हरीश इथापे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, प्राचार्य डॉ. सुभाष भंडागे, ज्येष्ठ पत्रकार प्रा. मधू जाधव, प्रा. दिलीप सावरकर, नामचे जिल्हा संयोजक माणिक शेळके, मंगेश भारसाकळे, सुरेखा मेतकर, शिवणकाम शिक्षिका सुनीता घोरड यांची उपस्थिती यावेळी होती. राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नाम फाउंडेशनचा विधवा शेतकरी महिलांना मदतीचा हात!
By admin | Updated: June 27, 2016 02:43 IST