जठारपेठ भागातील सावरकर सभागृहासमोर असलेल्या दोन ‘बी-सत्ता’ (बी टेन्युअर) भूखंडांवर एका दुमजली इमारतीचे बांधकाम करण्यात आले. मनपा हद्दीत शीट क्रमांक ७६ ए मधील ५/२ आणि ५/३ क्रमांकाचे हे भूखंड आहेत. या दोन भूखंडांचे क्षेत्र अनुक्रमे ११६१ चौरस मीटर आणि १०५६ चौरस मीटर इतके आहे. मनपाच्या नोंदीत हे दोन्ही भूखंड मोकळे दाखविण्यात आले असताना ‘मे. गोविंदा असोसिएट्स’ या बांधकाम कंपनीने या जागेवर दुमजली बांधकाम उभारले. बी-सत्ता असलेल्या भूखंडावर कोणतंही बांधकाम करता येत नाही, असा नियम आहे. बी-सत्ता' (बी टेन्युअर) भूखंडाचे ‘ए-टेन्युअर’ प्रकारात रूपांतर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. परंतु काेणत्याही भूखंडासाठी टीडीआर देण्याचे अधिकार मनपा प्रशासनाचे आहेत. टीडीआर देताना संबंधित भूखंड तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे की नाही, याची शहानिशा करण्याची जबाबदारी मनपाची आहे. जठारपेठच्या भूखंडावर बांधकाम करताना शासकीय नियम धाब्यावर बसविण्यात आल्याची तक्रार विजय मालाेकार यांनी मनपाकडे केली हाेती.
मनपाकडून स्थळ निरीक्षण
मनपा आयुक्त अराेरा यांनी प्राप्त तक्रारीची दखल घेत सदर जागेच्या स्थळ निरीक्षणाचे निर्देश दिले हाेते. त्या अनुषंगाने नगर रचना विभागाने स्थळ निरीक्षण केले. याप्रकरणी शुक्रवारी आयुक्तांच्या दालनात दाेन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर या दाेन भूखंडांपैकी शिट क्रमांक ७६ ए मधील ५/३ क्रमांकाच्या भूखंडावरील बांधकामाला स्थगिती देण्याचे निर्देश आयुक्तांनी जारी केले.