अकोला: गुरू-शिष्याचे नाते हे पवित्र असते; परंतु या नात्याला अकोल्यातील एका शिक्षकाने गुरूवारी काळिमा फासला. शहरातील एका महाविद्यालयातील शिक्षकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीशी लगट करण्याचा प्रयत्न करून, तिचा विनयभंग केला. या प्रकाराची वाच्यता कुठे केल्यास परिक्षेत नापास करण्याची धमकीसुद्धा शिक्षकासह त्याच्या दोन सहकार्यांनी दिली. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी तिघा जणांविरुद्ध गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. अकोल्यातील एस.आर. पाटील महाविद्यालयात शिकणार्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार, शिक्षक भरत वामनराव राणे हा नेहमी तिच्या गालावर, पाठीवर हात फिरवून लगट करण्याचा प्रयत्न करायचा. तुला चॉकलेट देतो, अँक्टीव्हा स्कूटर घेऊन देतो, तू घरी ये, असे शिक्षक म्हणत असल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. राणे यांची शिक्षण संस्थेकडे तक्रार केल्यानंतर, शाळेतील शिक्षक मिलिंद सुदामराव मनवर आणि बोरकर यांनी विद्यार्थिनी व तिच्या आईला तक्रार मागे न घेतल्यास परिक्षेत नापास करण्याची धमकी दिली. शिक्षकाच्या या धमकीने विद्यार्थिनी भांबावून गेली; मात्र गुरुवारी तिने शिक्षकांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार देण्याचे धाडस दाखविले. तिच्या तक्रारीनुसार शिक्षक भरत राणे, त्याचे सहकारी मिलिंद सुदामराव मनवर, शिक्षक बोरकर यांच्याविरुद्ध खदान पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी भादंवि कलम ३५४ (अ), ५0४, ५0६, ५0७ (३४) आणि बाल लैंगिक संरक्षण अधिनियम (पास्को) कलम १२ नुसार गुन्हा दाखल केला.
शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
By admin | Updated: October 1, 2015 23:54 IST