नीलेश जोशी / खामगाव : अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडणार्या तथा सरासरी ५0 टक्क्य़ांपेक्षा कमी पाऊस पडलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील नऊ तालु्क्यांत चाराटंचाई भासू नये, यासाठी हायड्रोपोनिक या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे चारानिर्मिती करण्यात येणार आहे. अवघ्या सात दिवसांत हा चारा तयार होत असल्याने मार्च महिन्यानंतर जिल्ह्यात निर्माण होणार्या संभाव्य चाराटंचाईला तोंड देण्यासाठी कृषी विभागाकडून हे प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कमी खर्चात अवघ्या आठ दिवसांत हा चारा शेतकर्यांना उपलब्ध होऊन पशुधनाची चार्याची समस्या निकाली निघण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे, या चारानिर्मितीसाठी माती किंवा जमिनीची गरज नसून, ट्रेमध्येच या चार्याचे उत्पादन घेता येणार आहे. उपरोक्त योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ५0४ शेतकर्यांची यासाठी निवड करण्यात येणार असून, तालुकानिहाय प्रत्येकी ५६ शेतकर्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तालुकानिहाय ४२ सर्वसाधारण गटातील, नऊ अनुसूचित जातीमधील आणि पाच अनुसूचित जमातीमधील शेतकर्यांची यासाठी निवड केली जाईल. यामध्ये प्रामुख्याने अल्पभूधारक शेतकरी आणि भूमिहीन शेतमजुरांना प्राधान्य देण्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. एकट्या बुलडाणा जिल्ह्यासाठी ३0 लाख २४ हजार रुपयांची तरतूद या उपक्रमासंदर्भात करण्यात आली आहे. प्रतिप्रकल्प २४ हजार रुपये खर्च अपेक्षित असून, २५ टक्के सबसिडी राज्य शासन या प्रकल्पासाठी देणार आहे.
चाराटंचाई निर्मूलनासाठी आधुनिक तंत्र
By admin | Updated: October 22, 2015 01:43 IST