अकोला: गुजरातमधील सुरत जिल्हय़ातील कफलेला गाव येथील रहिवासी एका विवाहित पुरुषाने अल्पवयीन मुलीस फूस लावून अकोल्यात पळवून आणल्याची घटना रविवारी उजेडात आली. या पुरुषावर गुजरातमध्ये खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती असून, तो दोन मुलांचा बापही असल्याचे समोर आले आहे.सुरत जिल्हय़ातील रहिवासी असलम खान सलीम खान याने सुरत शहरात राहणार्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून अकोल्यात पळवून आणले. सदर आरोपीने या मुलीला गत एक महिन्यापूर्वी पळवून आणले असून, तिला अकोल्यातील जुने शहरात ठेवले होते. या प्रकरणाचा तपास सुरत पोलीस करीत असताना त्यांना सदर मुलगी व असलम खान अकोल्यातील जुने शहरात असल्याची माहिती मिळाली. यावरून गुजरात पोलिसांनी रविवारी अकोल्यात दाखल होऊन दोघांनाही ताब्यात घेतले. असलम खान हा विवाहित असून, त्याला दोन मुले असल्याची माहिती आहे. यासोबतच तो खुनाच्या गुन्हय़ातील आरोपी असल्याचेही समोर आले आहे. गत एक महिन्यापासून तो अकोल्यात रहिवासी असून त्याने मुलीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची माहिती आहे. या मुलीचा लैंगिक अत्याचारही आरोपीने केला असून, दोघांनाही सुरत पोलीस रविवारी सायंकाळी अकोल्यातून घेऊन रवाना झाले आहेत.
अल्पवयीन मुलीस विवाहित पुरुषाने आणले पळवून
By admin | Updated: March 14, 2016 01:16 IST