अजय डांगे/ अकोला विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात धडकलेला हैद्राबाद येथील एमआयएम (ऑल इंडिया मजलिस-ए-एतिहाद अल मुसलिमिन) हा पक्ष आता समविचारी पक्ष आणि नेत्यांची मोट बांधण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यासाठी एमआयएमचे नेते अकबरूद्दीन ओवैसी लवकरच विदर्भात येणार असून, ते नागपूर, अमरावती आणि अकोला येथे येथे बैठक घेणार असल्याचे समजते. अल्पसंख्याकांच्या मतांचे राजकारण करणार्या कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस यासारख्या पक्षांमध्ये त्यामुळे अस्वस्थता पसरली आहे. यापूर्वीच्या कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आघाडी सरकारने मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी निकाली काढला होता. राज्यात अल्पसंख्याक समाजाची निर्णायक मतं असून, ती डोळय़ासमोर ठेऊनच आघाडी सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला होता; मात्र विधानसभा निवडणुकीत एमआयएमने राज्यातील ३५ ते ४0 टक्के मुस्लिम मतदारांवरच लक्ष केंद्रित केले होते. आता निवडणूक आटोपल्यानंतर एमआयएम विदर्भाकडे आपला मोर्चा वळविणार असल्याचे समजते. पहिल्या टप्प्यात नागपूर, अमरावती व अकोल्यात एमआयएमची शाखा सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एमआयएम समविचारी पक्ष आणि नेत्यांची मोट बांधणार आहे. यासाठी एमआयएमच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (युडीएफ), मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी आणि भारिप-बमसंच्या काही आजी-माजी पदाधिकार्यांशी संपर्क साधल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीत मुस्लिम उमेदवारांनी अल्पसंख्यांक समाजाची निर्णायक मतं खेचली. अशा उमेदवारांच्या संपर्कातही एमआयएमचे नेते आहेत. *एमआयएमचा प्रवास एमआयएमचे आमदार अकबरूद्दिन ओवैसी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे हा पक्ष चर्चेत आला. याप्रकरणी आमदार ओवैसींविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. हैद्राबाद महापालिकेत १५0 पैकी ४३ नगरसेवक एमआयएमचे आहेत. एमआयएमने महाराष्ट्रात पहिली धडक नांदेड येथे दिली. २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमने ५ मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले होते. त्यापैकी एक उमेदवार विजयी झाला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एमआयएमने 20 मतदारसंघांत उमेदवार उभे केले होते. त्यापैकी दोन उमेदवार विजयी झाले असून, ८ उमेदवार दुसर्या क्रमांकावर होते. या निवडणुकीत एमआयएमच्या सर्व उमेदवारांना एकूण ४ लाख ८९ हजार ६१४ मतं मिळाली.
एमआयएम बांधणार समविचारी पक्ष, नेत्यांची मोट
By admin | Updated: October 27, 2014 22:44 IST