अकोला: सांगळूद येथील राहूल रामकृष्ण डोंगरे हे भारतीय स्थल सेनेतून ३ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले. ४ फेब्रुवारीला त्यांचे गावात आगमन होताच गावकऱ्यांनी मिरवणूक काढून फुलांच्या वर्षाव करीत जवान राहुल डोंगरे यांचे स्वागत केले. यावेळी सैनिक राहूल डोंगरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला.
लहानपणापासूनच देश सेवा करण्याची इच्छा असल्याने सैनिक राहूल डोंगरे यांनी परिश्रम घेतले. सन २००४ मध्ये भारतीय सेनेत भरती होऊन नाशिक सेंटर कॅम्प येथे प्रशिक्षण घेतले. त्यांनी जम्मू काश्मीर, आसाम, पंजाब, राज्यस्थान यासह अनेक ठिकाणी देशसेवा केली. १७ वर्षे देशसेवा करून घरी परतल्यानंतर गावकऱ्यांनी सैनिकाचा सन्मान केला. सत्काराच्या कार्यक्रमानंतर सजवलेल्या वाहनातून गावात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान तिरंगी झेंडा घेत ‘भारत माता की जय’चा जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी सैनिकाचा सत्कार करण्यात आला. तसेच देशभक्तीपर गितांनी गावात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणूकी दरम्यान, सैनिक राहुल डोंगरे यांच्यासह आई नंदाताई डोंगरे, वडिल रामकृष्ण डोंगरे व भारतीय सैन्यात असलेले त्यांचे लहान भाऊ धम्मपाल डोंगरे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात सैनिक राहुल डोंगरे यांनी युवकांना मोफत फिटनेसचे धडे देणार असल्याचे सांगितले. (फोटो)