ज्ञानेश्वर मंदिर येथे जिजाऊ जयंती
अकोला : जुने शहरातील डाबकी राेड येथील ज्ञानेश्वर मंदिराच्या सभागृहात राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कीर्तनकार संगीता जोध, अर्चना शर्मा, गीतांजली शेगोकार, श्रीराम नवमी सेवा समितीचे अध्यक्ष विलास अनासने, अलका देशमुख, पुष्पा वानखडे, अनिल मानधने उपस्थित हाेते.
कंचनपूर येथे जिजाऊंना अभिवादन
अकाेला : राजमाता माँ साहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचे शहरालगतच्या कंचनपूर येथे आयाेजन करण्यात आले हाेते. याप्रसंगी रांगोळी स्पर्धेत वैष्णवी शेळके, अनुराधा चोरे, सुकन्या चोरे या मुलींनी सहभाग घेतला. यावेळी ग्रा.पं. सदस्य मीनाक्षी शेळके, ज्योती डिक्कर, सुनंदा चोरे, शालिनी चोरे, नीता चोरे, विद्या चोरे, सुनंदा चोरे उपस्थित होत्या.
भाजप कार्यालयात जिजाऊ जयंती
अकाेला : भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात मंगळवारी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांनी जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात, रामदास पाटील, माधव मानकर, हरिभाऊ काळे, विनोद पाटील, बंडू पाटील उपस्थित हाेते.
जलवाहिनी फुटली; पाण्याचा अपव्यय
अकाेला : जुन्या शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये गणेशनगर रस्त्यालगत जलवाहिनी फुटली. दुरुस्तीसाठी कंत्राटदाराने माेठा खड्डा खाेदला असून, जलवाहिनीची दुरुस्ती संथगतीने सुरू आहे. खड्ड्यामुळे वाहनचालकांच्या जीविताला धाेका निर्माण झाला आहे. हा खड्डा त्वरित बुजविण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
नालीची उंची वाढवली; वाहनचालक त्रस्त
अकाेला : अग्रसेन चाैकासमाेर क्रीडा संकुलाकडे जाणाऱ्या मार्गावर रस्ता रुंदीकरणाच्या अनुषंगाने माेठी नाली खाेदण्यात आली. सिमेंट नालीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी नालीची उंची वाढल्यामुळे रामदास पेठ भागाकडे जाणारे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
मुख्य नाला घाणीने तुडुंब
अकाेला : दुर्गा चाैकासमाेरील माेहन भाजी भांडाराजवळील मुख्य नाला घाणीने तुडुंब साचला आहे. नाल्यात प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिकच्या बाॅटलचा खच साचल्याचे दिसून येत आहे. सांडपाणी तुंबल्यामुळे स्थानिक रहिवाशांना घाण दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याकडे भाजप नगरसेवकांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
धुरामुळे रहिवाशांचे आराेग्य धाेक्यात
अकाेला : नायगाव येथे मनपाच्या डम्पिंग ग्राउंडवर शहरातील कचऱ्याची साठवणूक केली जाते. कचऱ्याला आग लागून धूर निघत असल्याने स्थानिक रहिवाशांच्या जीविताला धाेका निर्माण झाला आहे. धुरामुळे श्वास घेण्यास अडचण हाेत असून, हवा प्रदूषित झाली आहे.