अकोला: जीवघेण्या कोरोना व्हायरसचा जिल्ह्यातील पहिला रुग्ण शहरातील बैदपुरा व दुसरा रुग्ण अकोट फैल परिसरात आढळून आल्यानंतर महापालिकेच्या आशा वर्कर जीव धोक्यात घालून आरोग्य तपासणी करीत आहेत. आरोग्य तपासणीसाठी जाणाऱ्या आशा वर्करला अकोट फैल परिसरातील अकबर प्लॉट भागात काही महिला व नागरिकांनी धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. याप्रकरणी अकोट फैल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.अकोला शहरात ७ एप्रिल रोजी बैदपुरा भागात व दुसºयाच दिवशी ८ एप्रिल रोजी कोरोनाचा दुसरा ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण अकोट फैल परिसरात आढळून आला होता. ही बाब लक्षात घेता महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी बैदपुरा व अकोट फैल परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. सलग १४ दिवस नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याची जबाबदारी करवसुली लिपिक, शिक्षक व आशा वर्कर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. १७ एप्रिल रोजी दुपारी अकोट फैल परिसरातील अकबर प्लॉट भागात आरोग्य तपासणीसाठी गेलेल्या मनपाच्या पथकातील आशा वर्कर यांना स्थानिक रहिवाशांनी घेराव घालून त्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याची घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी पथक क्रमांक ३४ मधील रवी वानखडे, ज्योती गायकवाड, पथक क्रमांक ३५ मधील विजयसिंग पवार, किरण साळुंखे, अभिजित पोहे, टी. एम. देवरे यांनी अकोट फैल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
आरोग्य तपासणीसाठी गेलेल्या आशा वर्करला धक्काबुक्की, शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 17:21 IST