अकोला : सख्ख्या भाच्याची हत्या केल्याप्रकरणी आरोपी मामाला बुधवारी प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधईश व्ही. एन. तांबी यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि एक हजार रूपये दंड, न भरल्यास दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. मुर्तिजापूरातील लकडगंज परिसरात राहणारा सोनू राजू चव्हाण याच्याकडून जून्या वस्तीत राहणारे त्याचे मामा सुरेश महादेव देशमुख यांनी ७00 रूपये उधार घेतले होते. ५ ऑगस्ट २0१२ रोजी सायंकाळी सोनू उधारी मागण्यासाठी गेला. पैसे मागण्यावरून मामा व भाच्यामध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. सुरेश देशमुख याने सोनू चव्हाण याच्या डोक्यात दगड घातला. यात सोनू गंभीर जखमी झाला. सोनूला जखमी अवस्थेतच मुर्तिजापूरातील उपजिल्हा रूग्णालयामध्ये दाखल केले. परंतू त्याची प्रकृती नाजूक असल्याने त्याला सर्वोपचार रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यानच सोनूचा मृत्यू झाला. सोनूची पत्नी माया हिच्या तक्रारीनुसार मुर्तिजापूर पोलिसांनी सुरेश देशमुख याच्याविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. हत्याकांडाची सुनावणी न्यायाधिश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने ९ साक्षीदार तपासले. तीन साक्षीदार फितूर झाले. साक्षी व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी सुरेश देशमुख याला जन्मठेप आणि हजार रूपये दंड, दंड न भरल्यास दोन महिन्यांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ज्ञ विनोद फाटे यांनी बाजू मांडली.
भाच्याची हत्या करणा-या मामाला जन्मठेप
By admin | Updated: November 14, 2014 01:10 IST