अकोला: अकोला किंवा एक दोन जिल्ह्यांत नव्हे, तर राज्यातील मोठ्या शहरांमध्ये दरोडे टाकणारी तसेच सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष देणारी मोठी टोळी माना पोलिसांनी रविवारी जेरबंद केली. या टोळीतील नऊ सदस्यांना राष्ट्रीय महामार्गावरील चिचखेड शेतशिवारातून अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून धारदार शस्त्रांसह सोन्याचे बनावट बिस्कीट व साहित्य जप्त करण्यात आले आहे.बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी एका ट्रक चालकाची हत्या करीत दरोडेखोरांच्या टोळीने हैदोस घातला होता. या टोळीने लुटमार केल्यानंतर काही वाहनांची तोडफोड केली होती. या घटनेनंतर माना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अशाच प्रकारची टोळी दरोड्याच्या प्रयत्नात असताना माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुुगे पोलीस कर्मचाऱ्यांसह रविवारी गस्तीवर होते. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील एका शेतात दरोडेखोरांची ही टोळी संशयास्पद हालचाली करीत असल्याचे घुगे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शिताफीने या टोळीवर पाळत ठेवली असता जंगली डुकराची शिकार करून त्याचे मांस ही टोळी शेतात खात असल्याचे त्यांना दिसले. यावरून माना पोलिसांनी सदर टोळीतील नऊ जणांना मांस खातानाच रविवारी सायंकाळच्या सुमारास ताब्यात घेतले. या टोळीतील सदस्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून सोन्याचे बनावट बिस्कीट, धारदार शस्त्र व लोखंड कापण्याची आरी, बनावट सोन्याची नाणी, मोबाइल, मिरची पावडर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही टोळी राज्यातील मोठ्या शहरात तसेच राष्ट्रीय महामार्गावरील वाहन चालकांना व ढाब्याच्या मालकांना लुटमार करीत असल्याची माहिती समोर आली आहे. लुटमार करणाऱ्या टोळीची नावेही लुटमार करणारी टोळी बुलडाणा जिल्ह्यातील असून, यामध्ये दादाराव सीताराम पवार ६५, लहू दादाराव पवार ३३, जवाहरलाल दादाराव पवार २९, राहुल दादाराव पवार २६, ईश्वर अण्णा पवार २२, सोपान प्रभू चव्हाण २३, उदयसिंह बाळू पवार १९, सर्व रा. अंतरज तालुका खामगाव जिल्हा बुलडाणा व सदाशिव सुधाकर चव्हाण २२, विनोद सुभाष पवार २८ रा. दधम तालुका खामगाव जिल्हा बुलडाणा यांचा समावेश आहे. त्यांच्या आणखी काही साथीदारांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
चिचखेड शिवारातून अटक केलेली ही टोळी दरोड्याच्या तयारीतच असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून लोखंड कापण्यासह लुटमारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या टोळीने नांदेड, औरंगाबादसह काही शहरांमध्ये दरोडे टाकल्याची प्राथमिक माहिती असून, बाळापुरातील दरोड्यात यांचा संबंध आहे की नाही, याचा तपास करण्यात येत आहे, तसेच बनावट सोन्याचे आमिष देऊनही लुटमार केल्याची माहिती आहे.- भाऊराव घुगे,ठाणेदार, माना पोलीस स्टेशन, अकोला.