अकोला : शहरातील मोठे तसेच लहान नाल्यांची नियमित सफाई न करता देयके लाटण्याच्या उद्देशातून मनपामार्फत वर्षभरातून एकदा नाला सफाईचा गाजावाजा केला जातो. मान्सूनपूर्व नाला सफाईची कामे आता सुरू करणे अपेक्षित असताना, या मुद्दय़ावर प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात दंग आहे. अर्थात पावसाळ्य़ाच्या तोंडावर थातूरमातूर कामे करण्याचा प्रशासनाचा बेत दिसून येतो. शहराच्या विविध भागांत झोननिहाय ४00 पेक्षा जास्त मोठे आणि लहान नाले आहेत. सदर नाल्यांची मनपाच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने नियमित सफाई करण्याची गरज आहे. तसे न करता मान्सूनपूर्व नाला सफाईच्या नावाखाली दरवर्षी लाखो रुपयांचे देयके लाटली जातात. मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या कालावधीत कमी दराने निविदा प्रकाशित करण्यात आल्या होत्या. कामे करायची असतील तर करा, असा सज्जड दम आयुक्तांनी दिल्यानंतर अवघ्या १६ लाख रुपयांत शहरातील मोठय़ा नाल्यांची स्वच्छता करण्यात आली होती. यावर्षी ही प्रक्रिया सुरूहोणे अपेक्षित होते. यादरम्यान आरोग्य विभाग नाल्यांची संख्या वाढविण्याच्या मानसिकतेत असून, तसे झाल्यास मनपाला लाखो रुपयांचा चुना लागण्याची दाट शक्यता आहे.
मान्सूनपूर्व नाला सफाईला ‘खो’
By admin | Updated: May 12, 2015 01:38 IST