अकोला : बाळापूर विधानसभा मतदारसंघात भाजपची उमेदवारी स्थानिक नेत्यांपैकीच एकाला देण्यात यावी, अशी आग्रही मागणी तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी करीत आहेत. त्यासाठी मंगळवारी सकाळी तालुक्यातील ४0 आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार संजय धोत्रे यांना निवेदन देऊन स्थानिक उमेदवार न दिल्यास सर्व राजीनामे देऊ,असा इशारा दिला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच जाहीर होणार आहे. सर्वच राजकीय पक्षातील अनेकांनी उमेदवारीसाठी ह्यफिल्डींगह्ण लावली आहे. बाळापूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून स्थानिक उमेदवाराची मागणी मागील दोन निवडणुकांपासून होत आहे. याबाबत भाजप नेत्यांकडून गांभीर्याने विचार होत नसल्याने त्याचे परिणामही पक्षाला भोगावे लागले आहेत. परिणाम दोन्ही वेळा भाजपला ही जागा गमवावी लागली. त्यातूनच यावेळी पुन्हा बाळापूर मतदारसंघातील स्थानिक वाद उफाळून आला. भाजपचे माजी पदाधिकारी उमेश जाधव यांच्यासह बाळापूर तालुक्यातील ४0 पदाधिकारी आणि कार्यकर्ते मंगळवारी खासदार संजय धोत्रे यांच्या निवासस्थानी निवेदन देण्यासाठी गेले होते.यावेळी खासदारांनी त्यांना स्थानिक नेत्यांपैकी विरोधकांच्या उमेदवारांविरुद्ध लढत देऊ शकेल असा तोडीचा उमेदवार नसल्याने स्थानिक उमेदवाराचा आग्रह धरणे पक्ष हिताचे नसल्याचे सांगितले. त्यानंतरही या पदाधिकार्यांनी स्थानिक उमेदवाराचा आग्रह धरत प्रदेश पातळीवरील नेत्यांकडे राजीनामा पाठविण्याचा इशारा दिला आहे.
बाळापुरात स्थानिक उमेदवाराचा वाद भाजपमध्ये पुन्हा उफाळला!
By admin | Updated: August 27, 2014 00:57 IST