अकोला- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या युवकांना खरी गरज आहे. ग्रामगीतेतून राष्ट्रसंतांनी दिलेले विचार ही जीवन जगण्याची जडीबुटी असल्याचे प्रतिपादन अँड. संतोष मोरे यांनी रविवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी आयोजित युवक संमेलनामध्ये केले. तुकडोजी महाराज सेवा समितीतर्फे मोठय़ा उमरीत आयोजित दोन दिवसीय संमेलनाचा समारोप राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली वाहून करण्यात आला. सकाळच्या सत्रात गुरुदेव भजन मंडळ राऊतवाडी, ढोलाचे भजन मंडळ, वारकरी भजन मंडळ, महिला भजन मंडळ, खंजिरी भजन मंडळ तसेच बालिका भजन मंडळ खडकी यांनी भजने सादर केली. हभप प्रभुदास महाराज यांचे ग्रामगीतेवर प्रवचन झाले. तसेच स्वर गुंज इंद्रधनुष्य यांचा बहारदार कार्यक्रम झाला. दुपारच्या सत्रात आचार्य हरिभाऊ वेरूळकर यांचे ग्रामगीतेवर प्रवचन झाले. युवक संमेलनात संतोष मोरे यांच्यासह प्रशांत बुले, सुमित जोशी, कृष्णा पखाले, अँड. संतोष गावंडे यांनी सहभाग घेतला. प्रमुख उपस्थितांमध्ये संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष पंकज जायले, रणजित काळे, सतीश मानकर, दीपक पाटील आदींची उपस्थिती होती. संचालन अमोल नावकार यांनी केले तर आभार माणिक शेळके यांनी मानले. ह्यराष्ट्रसंतांची आदर्श ग्रामविकास संकल्पनाह्ण या विषयावर रामेश्वर बरगट यांचे व्याख्यान झाले. गुरुदेव सेवा बाल भजन मंडळ गोरेगाव यांनी भजन सादर केले. सुगम संगीतावर प्रा. निरंजन लांडे यांचा कार्यक्रम झाला. राजेश सोनोने यांचा भजनसंध्या कार्यक्रम आयोजित केला होता. सायंकाळी ६.३0 वाजता मौन श्रद्धांजली व सर्वधर्मीय प्रार्थना झाली. संदीपपाल महाराज यांच्या समाजप्रबोधनपर कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली.
जीवन जगण्याची जडीबुटी ग्रामगीता- संतोष मोरे
By admin | Updated: February 23, 2015 01:56 IST