अकोला : रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात गेल्यावर्षी ९ हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली. शेतकर्यांचा कल फळबाग लागवडीकडे वाढला आहे; परंतु नैसर्गिक आपत्ती व पाण्याची कमतरता भासत असल्याने यावर्षी अनेक ठिकाणी बागा वाचविण्यासाठी शेतकर्यांना श्रम घ्यावे लागत आहेत. या अगोदर राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत जिल्ह्यात साडेचार हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली होती. यामध्ये संत्रा, लिंबू फळबागाचे प्रमाण अधिक होते. तथापि पुरेपूर पाण्याची सोय नसल्याने शेतकर्यांपुढे बागा जगविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. तापमानाचा वाढता पारा बघता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील फळझाडांना टँकरने पाणी देऊन वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केले जात आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत जिल्ह्याला मिळालेल्या अनुदानात फुलशेती व जलसंधारणाच्या कामाचादेखील समावेश आहे. तथापि गेल्या दोन वर्षांपासून पूरक पाऊस नसल्याने या बागा जगविण्याचे मोठे आव्हान शेतकर्यांपुढे आहे. अनेक ठिकाणी टँकरने पाणी देऊन फळबाग जगविण्यासाठी शेतकर्यांना कसरत करावी लागत आहे.
** लेमन सिटीची ओळख पुसट
१९९०-२००० पर्यंत अकोला जिल्हा लेमन सिटी म्हणून ओळखला जात होता. वाडेगावचे लिंबू पंजाब, हरियाणा, दिल्लीसह अनेक प्रातांत जात होते. लिंबू प्रक्रिया उद्योगही येथे उभारण्यात आले होते. तथापि आता लिंबूचे क्षेत्र कमी झाले असून लेमन सिटीची ओळख पुसट झाली आहे.
**८,९२२ हेक्टर क्षेत्रावर फळबाग
३,१५० हेक्टरवर संत्रा आहे. दुसर्या क्रमांकावर २३०० हेक्टर लिंबू असून, केळी २२५० हेक्टरवर आहे. मोसंबी १५ हेक्टर, पेरू १५२, डाळिंब २५०, चिकू ७५, सीताफळ ७५,आवळा ९० तर आंबा ६२५ हेक्टर क्षेत्रावर आहे. गेल्या दोन वर्षांत शेतकर्यांनी फळ पिकांचे क्षेत्र वाढविले आहे; परंतु उद्भवणार्या पाणीटंचाईमुळे शेतकरी हतबल झाला आहे.