अकोला: रोकड असलेली बेवारस बॅग, सोन्याचे दागिने पाहून कोणाचीही नियत फिरल्याशिवाय राहणार नाही. विनाश्रम मिळालेला पैसा, सोन्याचे दागिने कोणाला हवे नसतात. अनेकजण चालून आलेल्या संधीचे ह्यसोनेह्ण करण्याची संधी सोडत नाही; परंतु आजही समाजात प्रामाणिकपणा जपणारे व्यक्तीमत्त्व सापडतात. त्याचा प्रत्यय सोमवारी अकोल्यात आला. रेल्वे स्टेशनवरील अहमद अली शौकत अली (रा. मुल्लानी चौक) या ऑटोरिक्षा चालकाने प्रवासी महिलेची राहिलेली सोन्याची दागिने असलेली बॅग रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करून आपली नीतिमत्ता जपली. बोरगाव खुर्द येथील कल्पना नितीन सुलताने ही महिला तिच्या नातेवाईकाकडे चांदूर रेल्वे येथे गेली होती. सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास नागपूर-भुसावळ पॅसेंजरने त्या अकोला रेल्वे स्टेशनवर आल्या. त्या बसस्टँडजवळील एका दवाखान्यात जाण्यासाठी अहमद अली यांच्या ऑटोरिक्षामध्ये बसल्या. त्यांच्यासोबत २५ गॅ्रमचे मंगळसूत्र, सोनसाखळी ९ ग्रॅम, अंगठी ४ ग्रॅम, टॉप्स ४.५0 ग्रॅम असे सोन्याची दागिने असलेली बॅग होती. कल्पना सुलताने ऑटोरिक्षामध्येच बॅग विसरल्या. ऑटोरिक्षा चालकाच्या लक्षातही ही बाब आली नाही. काही तासानंतर एक प्रवासी ऑटोरिक्षात बसल्यानंतर त्याने ही बॅग कोणाची असे विचारल्यावर अहमद अलीच्या ही बाब लक्षात आली. त्याने बॅग तपासली असता, त्यात सोन्याचे दागिने असल्याचे त्याला दिसले. त्याने लगेच रेल्वे पोलीस ठाण्यात जात, बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली. सायंकाळी कल्पना सुलताने व तिचे नातेवाईक तक्रार देण्यासाठी रेल्वे पोलीस ठाण्यात आले असता पोलिसांनी त्यांना अहमद अलीने बॅग आणून दिल्याचे सांगितले. पोलिसांनी सोन्याचे दागिने असलेली बॅग कल्पना सुलताने यांच्या स्वाधीन केली.
एक लाखाच्या दागिन्यांची बॅग केली परत!
By admin | Updated: September 1, 2015 01:57 IST