मूर्तिजापूर : संपूर्ण आयुष्यभर स्वकर्तत्वातून स्वच्छता व सामाजिक सुधारणांचा संदेश देणार्या गाडगेबाबा यांची कर्मभूमी म्हणून मूर्तिजापूरचा उल्लेख मोठ्या अभिमानाने केला जातो; परंतु याच शहरात सार्वजनिक स्वच्छतागृह अर्थात शौचालय व मुत्रीघरांचा अभाव असणे ही एक शोकांतिकाच आहे.शासनाने ज्यांच्या नावाने ग्रामस्वच्छता अभियान, गोदरीमुक्त अभियान, निर्मल ग्राम अभियान यासारख्या मोहिमा राबविल्या त्याच गाडगेबाबा यांची कर्मभूमी असलेल्या मूर्तिजापूर शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही अपवाद वगळता सर्वच भागांत कचर्याचे ढीग आढळून येतात. एवढेच नव्हे, तर संपूर्ण शहरात कुठेही सार्वजनिक मुत्रीघर व शौचालय आढळून येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून येथे आलेल्या तसेच आपल्या कामांसाठी घरातून बाहेर पडलेल्या शहरातील नागरिकांना उघड्यावरच विधी उरकावा लागतो. यामुळे शहराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. मूर्तिजापूर शहर दिवसागणिक फुगत आहे. खेड्या-पाड्यांमधील लोक नागरी सुविधांचा लाभ मिळावा म्हणून शहरात स्थायिक होत आहेत. एवढेच नव्हे तर मूर्तिजापूर शहर राष्ट्रीय महामार्ग व मुंबई-कोलकाता लोहमार्गावर असल्याने येथे दैनंदिन हजारो प्रवाशांची ये-जा असते. तसेच ग्रामीण भागातून विविध कामांसाठी लोकांचे शहरात येणे-जाणे असते. शाळा व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठीही ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात येतात. शहरात रेल्वेस्टेशन व बसस्थानकावरील मुत्रीघर व शौचालयाव्यतिरिक्त कुठेही स्वच्छता गृह आढळून येत नाहीत. पुरुष मंडळी कुठेही थोडासा आडोसा घेऊन विधी उरकून घेतात; परंतु महिलांची फार कुचंबणा होते. मूर्तिजापूर शहराने इतर शहरांच्या तुलनेत जास्त वेगाने आधुनिकीकरणाकडे वाटचाल सुरू केली आहे. मोठमोठी व्यावसायिक प्रतिष्ठाने, सुशोभीकरणाच्या नावावर विविध कामे झाली आहेत. तथापि मुख्य चौकांमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहे नसणे ही खेदाची बाब आहे.
गाडगेबाबांच्या कर्मभूमीत स्वच्छतागृहांचा अभाव
By admin | Updated: May 14, 2014 19:47 IST