खामगाव : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संलग्नीत बोरीअडगाव व पिंपळगाव राजा येथील उपबाजार गत अनेक वर्षापासून बंद स्थितीत आहेत. या भागातील शेतकर्यांसाठी सुविधा म्हणून चालू करण्यात आलेल्या या उपबाजारातील लाखो रुपयांच्या इमारती आज धुळखात पडल्या आहेत. त्यामुळे बंद असलेल्या उपबाजाराला पुर्ववत सुरु करण्यासाठी नवसंजिवनीची गरज आहे.शेतकर्यांच्या माल विक्रीसाठी तसेच जनावरे विक्रीकरिता खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सदैव सज्ज आहे. मात्र तालुक्यातील शेवटच्या टोकावरुन तसेच जवळ असलेल्या इतर तालुक्यातील शेतकर्यांना खामगावला येणे जाणे दुरचे होते. याचा विचार करुन शेतकर्यांना त्यांचा माल विक्रीसाठी परिसरातच धान्य बाजार व कापसाची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या दिशेने शासकीय स्तरावरुन प्रयत्न करण्यात आले. यावेळी तालुक्यातील बोरीअडगाव व पिंपळगाव राजा या ठिकाणी उपबाजाराची निर्मिती करण्यात आली. या दोन्ही ठिकाणी धान्य बाजार सुरुवात ही झाली.खामगाव तालुका हा कापसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. तालुक्यासह जवळच्या परिसरात कापसाचे वाढलेले पाहता. शेतकर्यांना खामगावला कापूस विक्रीसाठी जाणे दूर पडत होते. तेव्हा खामगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने १५ फेब्रुवारी १९८४ रोजी बोरीअडगाव येथे जिनिंग फॅक्टरीचे उद्घाटन झाले. जिनिंग सुरुझाली. बोरीअडगाव येथे रुईच्या गाठी बनत होत्या. तसेच २00 ते २५0 मजुरांना कापूस संकलन केंद्रावर रोजगारही मिळत होता. बोरीअडगाव येथे शेतकर्यांना जाणे येणे सोयीचे म्हणून या भागातील ३0 ते ३५ खेड्याची नाड बोरीअडगावशी जुडली शेतकर्यांची वाढती संख्या पाहता येथे राज्य शासनाच्या वतीने बचत भवन, शेतकरी निवासाची व्यवस्था करण्यात आली. १२ ते १५ एकराच्या परिसरात लाखो रुपयाच्या इमारती बांधण्यात आल्या. कापूस पणन महासंघाची कापूस खरेदी असेपर्यंंत येथे रेलचेल होती. मात्र पणन महासंघाची कापूस खरेदी बंद होताच उपबाजारावर अवकळा आली. धान्य बाजारालाही व्यापार्यांचा फारसा प्रतिसाद नसल्याने तो बंद पडला व सद्यास्थितीत उपबाजारासाठी असलेली जागा व इमारती सध्या धुळखात पडल्या आहेत.
खामगाव बाजार समितीचे उपबाजार बंदच !
By admin | Updated: August 28, 2014 00:50 IST