अकोला : आपल्या विविध सामाजिक कार्याने परिचित असलेल्या कस्तुरी चॅरिटेबल सोसायटीचा चवथा वर्धापन दिन मंगळवारी थाटात साजरा करण्यात आला. यावेळी कस्तुरी भूषण आणि कस्तुरी रत्न पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संघवीवाडी येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप संजय महाराज पाचपोर, तर विशेष अतिथी म्हणून श्रीराम महाराज व हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार वसंतराव खोटरे, जि.प. सदस्य ज्योत्स्ना चोरे, शांताबाई आळशी, भाऊसाहेब पोटे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यावेळी व्याळा येथील हभप नारायण महाराज तर्हाळे यांना कस्तुरी भूषण, तर पंढरपूर येथील हभप शकुंतलाबाई टेकाडे यांना कस्तुरी रत्न पुरस्कार बहाल करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना शंकुतलाबाई टेकाडे यांनी कार्य करणार्याला संस्थेचा पुरस्कार मिळत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. कस्तुरीची उत्तरोत्तर प्रगती होवो व त्यांच्याकडून सद्कार्य घडो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नारायण महाराज तर्हाळे यांनी कस्तुरीचा सुगंध जसा सर्वांना आनंद देतो, तसा या संस्थेच्या कार्याचा सुगंध सर्वत्र दरवळो, अशा भावना व्यक्त केल्या. संत कार्याला पुढे नेण्याचे काम कस्तुरी करीत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी सेवानवृत्त शिक्षक पुरुषोत्तम परनाटे यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. पाखर विधान योजनेअंतर्गत अकोल्यातील यशोदाबाई पागे यांना यावेळी दत्तक घेण्यात आले. पुरस्कृत करण्यात आलेल्या मान्यवरांचा परिचय रिता घोरपडे व डॉ. विद्या राऊत यांनी करून दिला. यावेळी कोमल खांडेकर हिला शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. शिक्षणतज्ज्ञ मोरेश्वर मोर्शीकर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी आपल्या भाषणातुन कस्तुरीच्या कार्याचा गौरव केला. संचालन अश्विनी ठाकरे यांनी, तर आभार प्रा. किशोर बुटोले यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. कार्यक्रमाला कस्तुरीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
कस्तुरी भूषण, कस्तुरी रत्न पुरस्काराचे वितरण
By admin | Updated: August 27, 2014 00:53 IST