उरळ (अकोला): बसची वाट पाहत उभी असलेली एक महिला काळीपिवळीच्या धडकेने ठार झाल्याची घटना रविवार, २८ सप्टेंबर रोजी आकोट-शेगाव मार्गावरील निंबा फाट्यावर घडली. उरळ पोलिसांनी काळीपिवळी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, शेगाव येथील अंबिकाबाई बाळू संभारे व इतर महिला निंबा फाट्यावर शेगावकडे जाणार्या बसची वाट पाहत उभ्या होत्या. थोड्या वेळाने ११.४५ वाजताचे सुमारास चांदूर बाजार-शेगाव ही बस फाट्यावर आली. या महिला बसमध्ये चढत असताना फाट्यावर उभ्या असलेल्या एमएच ३0 ई ९२५३ क्रमांकाच्या काळीपिवळी टॅक्सीच्या चालकाने अचानकपणे त्याची गाडी मागे घेतली. या काळीपिवळीचा जोरदार धक्का बसमध्ये चढत असलेल्या अंबिकाबाई संभारे यांना बसला. यात त्या गंभीर जखमी झाल्या. काळीपिवळी चालकाने अंबिकाबाई यांना उपचारासाठी तातडीने शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात हलविले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. काळीपिवळीच्या धक्क्याने बसच्या दाराचेही नुकसान झाले. बसचालक संजय नामदेवराव मालगे (रा. चांदुरबाजार) यांनी उरळ पोलिसां त फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून उरळ पोलिसांनी काळीपिवळी चालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३३७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
काळीपिवळीने महिलेस चिरडले
By admin | Updated: September 29, 2014 02:09 IST