अकोला : शहरातील बिडी व्यापारी पंकज पटेल यांना मारहाण करून त्यांच्याकडील ५ लाख ४५ हजार रुपयांची रक्कम लुटणार्या टोळीचा शुक्रवारी पर्दाफाश करण्यात आला आहे. या टोळीतील पाच आरोपींना शुक्रवारी व दोन आरोपींना शनिवारी अटक करण्यात आली असून, यामधील दोन अल्पवयीन आरोपींना सोडण्यात आले तर पाच आरोपींना न्यायालयाने २ डिसेंबरपर्यंंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सिव्हिल लाइन्स पोलिसांनी या प्रकरणातील ३ लाख ८0 हजार रुपये चोरट्यांकडून जप्त केले असून, आरोपींनी गुन्हय़ाची कबुली दिली आहे. तोष्णीवाल लेआऊट परिसरातील रहिवासी पंकज पटेल १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता ५ लाख ४५ हजार रुपयांची रक्कम घेऊन जात असताना शासकीय दूध डेअरीनजिक शनी मंदिरासमोर त्यांना वाहनावर आलेल्या चार युवकांनी मारहाण करून त्यांच्याकडील रक्कम असलेली बॅग घेऊन पळ काढला. भरदिवसा घडलेल्या या लुटमार प्रकरणामुळे पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली. पोलिसांनी या प्रकरणाचा शोध सुरू केला, मात्र यामधील आरोपींचा सुगावा लागला नाही. गुरुवारी मध्यरात्री सिव्हिल लाइन्स पोलीस गस्तीवर असताना नेहरू पार्क चौकातील पाण्याच्या टाकीजवळ पाच युवक दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना सिव्हिल लाइन्स पोलिसांनी अटक केली. या पाचही युवकांची चौकशी केली असता त्यांनी बिडी व्यापारी पंकज पटेल यांना मारहाण करून त्यांच्याकडील रक्कम लुटल्याची कबुली दिली. यामध्ये आळशी प्लॉट येथील रहिवासी गुड्डू गणेश परिहार, खदान येथील रहिवासी चंदू किशोर निखले, शिवसेना वसाहत येथील रहिवासी दुर्गेश ऊर्फ गोटू गजानन राऊत यांचा समावेश होता. या आरोपींना शुक्रवारी अटक करण्यात आली असून, शनिवारी शिवसेना वसाहत येथील रहिवासी चेतन मारोती डिवरे व रामेश्वर सुधाकर डाहे यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बिडी व्यापा-यास लुटणारे आरोपी जेरबंद
By admin | Updated: November 30, 2014 00:47 IST