अकोला : जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात भारिपचे दोन-दोन आमदार असताना, जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर धरणे देण्याची वेळ आल्याचे दिसत आहे. कमी पाऊस असलेल्या राज्यातील १२३ तालुके दुष्काळग्रस्त तालुके म्हणून राज्य शासनामार्फत नुकतेच जाहीर करण्यात आले. या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये अकोला जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश करण्यात आला नाही. चुकीचे सर्व्हे व आणेवारीद्वारे जिल्ह्यातील चित्र परिस्थितीपेक्षा वेगळे दाखविण्यात आले. वास्तविकता बघता, जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये कमी पावसामुळे दुबार-तिबार पेरणी करूनही शेतकरी आपत्तींना तोंड देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, जनावरांकरिता चारा डेपो तातडीने सुरू करण्यात यावे, पाणीटंचाई निवारणाची कामे तत्काळ सुरू करण्यात यावी, रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यात यावी व जिल्ह्यातील शेतकर्यांना सरसकट २५ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात यावी, इत्यादी मागण्यांसाठी भारिप-बमसंच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. वास्तविक जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची बाब शासनाच्या अखत्यारित असून, याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची गरज आहे, त्यासाठी भारिप-बमसंचे जिल्ह्यातील दोन आमदारांकडून शासन दरबारी प्रयत्न होणे अपेक्षित आहे; मात्र पक्षाचे दोन-दोन आमदार असताना, जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्याची वेळ आल्याचे भारिप-बमसंने दिलेल्या धरणे आंदोलनाने स्पष्ट होत आहे. या धरणे आंदोलनात भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बळीराम सिरस्कार, डी.एन. खंडारे, दिनकर वाघ, जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, शेख गुलाम शे.हुसेन, संजय मुळे, विजय चक्रे,अश्वजित सिरसाट, रमेशभाई भोजने, जीवन डिगे, सुरेंद्र तेलगोटे, शेख साबीर शे.मुसा, प्रा.सुरेश पाटकर, मनोहर शेळके, प्रदीप शिरसाट, दामोदर जगताप, ज्ञानेदव गवई, एकनाथ सिरसाट, अशोक शिरसाट,अशोक देवर, अशोक राठोड, जमीरउल्लाखाँ, सिद्धार्थ सिरसाट व इतर पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
दोन आमदार असताना भारिप कार्यकर्त्यांवर धरणे देण्याची वेळ
By admin | Updated: August 22, 2014 00:37 IST