अकोला : शेतकर्यांचा सच्चा साथी असलेल्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव पोळा सोमवारी शहरात साजरा झाला. यावर्षी पोळ्याच्या उत्सवावर दुष्काळाचे सावट जाणवत होते. यावेळी घेण्यात आलेल्या उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धेत जुने शहरातील मांडेकर बंधू यांच्या बैलजोडीला उत्कृष्ट जोडीचा पुरस्कार बहाल करण्यात आला. शेती आणि शेतकरी यांच्या सोबतीलाच महत्त्व आहे ते बैलांचे. वर्षभर राबणार्या बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उत्सव ग्रामीण भागासोबतच अकोला शहरातदेखील उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शहराचा मुख्य पोळा जुने शहरातील पोळा चौकात भरला. या ठिकाणी शेतकर्यांनी आपापले बैल सजवून आणले. सजलेल्या बैलांसोबतच त्यांचे मालकदेखील नवीन कपडे घालून जमले होते. सर्वप्रथम येथे आलेल्या बैलजोडींचे पूजन करण्यात आले. मानाची समजली जाणारी दशरथ वानखडे यांची बैलजोडी अग्रभागी होती. त्यानंतर मोतीराम वानखडे यांची जोडी व नंतर इतर जोड्या रांगेत उभ्या करण्यात आल्या. प्रथेप्रमाणे तोरण तोडून पोळा फोडण्यात आला. विविध मंदिरात बैलांना दर्शनासाठी नेण्यात आले. यानंतर घरोघरी बैलांची पूजा करण्यात येऊन पुरणपोळीचा व ठोंबर्याचा प्रसाद देण्यात आला. पोळा चौकासह आकोट फैल, कौलखेड, खडकी, उमरी आदी ठिकाणीदेखील पोळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. पोळा चौकात पोळा पाहण्यासाठी आबालवृद्धांनी एकच गर्दी केली होती. परिसरात विविध खेळण्याची व खाद्य पदार्थांची दुकाने सजली होती. यामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
दुष्काळाच्या सावटात साजरा झाला पोळा
By admin | Updated: August 26, 2014 22:06 IST